मुंबई: कोरोनामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक उशिराने होत आहे. पालिकेच्या २२७ प्रभागात वाढ करून २३६ प्रभाग करण्यात आले आहेत. या २३६ प्रभागांपैकी अनुसूचित जाती. अनुसूचित जमाती तसेच महिला आरक्षणासाठी लॉटरी काढण्यात आली. यावेळी निवडणूक विभागाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अनुसूचित जाती, जमाती यांचे तसेच महिलांचे काही प्रभाग आधीच निश्चित करण्यात आले होते. २३६ पैकी ३२ प्रभागांची लॉटरी काढण्यात आली. यामुळे या लॉटरीला विरोध केला जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाला विरोध केला जात असला तरी तसा विरोध लॉटरी नंतरच्या सूचना व हरकतींमधून दिसून आलेला नाही. पालिकेच्या २४ विभाग कार्यलयात गेल्या दोन दिवसात केवळ ३ हरकती आल्या आहेत. सूचना व हरकती देण्यासाठी ६ जून हि अखेरची तारीख आहे. अखेरच्या तारखेला जास्त संख्येने सूचना व हरकती येऊ शकतात अशी शक्यता पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाच्या लॉटरीत काँग्रेसच्या २९ नगरसेवकांपैकी २२ प्रभाग महिला आरक्षित झाले आहेत. यासाठी काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. ६ जून पर्यंत काँग्रेस यावर हरकती नोंदवणार असून त्यानंतरही न्याय न मिळाल्यास कोर्टात जाण्याचा इशारा मुंबई अध्यक्ष भाई जगताप व पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिला आहे.