मुंबई - शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबई महापालिकेचे काही विभाग प्रमुख निवृत्त झाले आहेत. मात्र, त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्तीच झाली नसल्याने ही पदे गेल्या चार दिवसापासून रिक्त राहिली आहेत. कोरोना आणि चक्रीवादळ यामुळे या पदावर अद्याप कोणाची नियुक्ती करण्यात आली नासल्याचे समजते.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेचे अधिकारी कर्मचारी पालिकेत आपली सेवा बजावत आहेत. कोरोनाच्या परिस्थितीत पालिका करत असलेले काम जनसंपर्क विभागाकडून मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचवले जात आहे. या विभागाचे प्रमुख असलेले विजय खबाले पाटील हे 31 मे ला निवृत्त झाले आहेत. पालिकेचे कामकाज सभागृह आणि समित्यांच्या माध्यमातून केले जाते. सभागृह आणि समित्यांचे कामकाज चिटणीस विभागाकडून चालवले जाते. या चिटणीस विभागाचे प्रमुख प्रकाश जेकटे हे सुद्धा 31 मे ला निवृत्त झाले आहेत. त्यांना वाढीव कालावधी दिला जावा म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्र दिले होते. मात्र, विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आक्षेप घेतल्यावर पालिका आयुक्तांनी जेकटे यांना वाढीव कालावधी देण्यास नकार दिला आहे.
पालिकेच्या आप्तकालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख असलेले महेश नार्वेकर हे सुद्धा निवृत्त झाले आहेत. मात्र, हे पद अत्यावश्यक सेवेच्या अंतर्गत येत असल्याने नार्वेकर यांना ओएसडी म्हणून नियुक्त करत याच विभागातील संगीता लोखंडे यांच्याकडे या विभागाचा चार्ज देण्यात आला आहे. पालिकेच्या काही विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. मात्र, कोरोनाची परिस्थिती आणि चक्रीवादळ यामुळे गेल्या चार दिवसात या विभाग प्रमुखांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नसल्याचे समजते.