मुंबई - रविवारपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू असताना एप्रिल महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या वैधानिक आणि इतर समित्यांच्या निवडणुका होणार का ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र, या निवडणुका ठरल्यावेळीच होतील असे पालिकेच्या चिटणीस विभागाने स्पष्ट केल्याने या चर्चांना आता विराम मिळाला आहे.
मुंबई महापालिकेचा कारभार सभागृह, वैधानिक व विशेष समित्यांच्या तर स्थानिक पातळीवर कारभार प्रभाग समित्यांच्या माध्यमातून चालवण्यात येतो. महापालिकेच्या २४ प्रभाग समित्यांचे कामकाज १७ प्रभाग समित्यांच्या माध्यमातून केले जाते. पालिकेमध्ये पाच वेळा सत्ता असलेल्या शिवसेनेची २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपासोबत युती झाली नव्हती. याकारणाने महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व इतर समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या नगरसेवकांची निवड करण्यात आली होती.
भाजपकडे शिवसेनेच्या जवळपास संख्याबळ असतानाही प्रभाग समित्या वगळता कोणत्याही समित्यांवर दावा न करता पाहरेकऱ्याची भूमिका घेतली. नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपाची युती झाली आहे. यामुळे भाजपा नगरसेवकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. याबाबतचा जो काही निर्णय घ्यायचा तो मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु असल्याने पालिकेच्या समित्यांच्या निवडणुकीमध्ये भाजपाला स्थान देण्याचा निर्णय होणे शक्य नसल्याने या वर्षीही समित्यांवर शिवसेनेचे अध्यक्ष निवडून येणार असल्याचे स्पष्ट आहे.
कोणाकडे किती समित्या -
मुंबई महापालिकेत महापौर शिवसेनेचा आहे. पालिकेतील स्थायी, बेस्ट, सुधार, शिक्षण या वैधानिक तर महिला व बाल विकास, आरोग्य, स्थापत्य (शहर), स्थापत्य (उपनगर), विधी, बाजार व उद्यान या समित्यांवर शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. २४ विभागात असलेल्या १७ प्रभाग समित्यांमध्ये ९ प्रभाग समित्या भाजप व अखिल भारतीय सेनेकडे असून उर्वरित ८ समित्या शिवसेनेच्या ताब्यात आहेत.