मुंबई - गुणवत्ता नसल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून मराठी माध्यमांच्या शाळा बंद केल्या जात आहेत, असा दावा सर्व्हे करणाऱ्या विविध खासगी संस्थांकडून केला जात होता. मात्र, सध्या मुंबई महापालिकेच्या शाळेतील ऑनलाइन शिक्षण राज्यभरातील शाळांसाठी एक 'आयडॉल' म्हणून समोर आले आहे. या ऑनलाइन शिक्षणाची दखल थेट शालेय शिक्षण विभागाने घेतली असून त्यासाठी विभागाने आज राज्यातील इतर शाळांना सुद्धा या महापालिकेतील शिक्षणाच्या ऑनलाइन शिक्षणाचा लाभ मिळावा म्हणून एक परिपत्रक जारी केले आहे. यामुळे राज्यात पहिल्यांदाच मुंबई महापालिकेतील ऑनलाइन शिक्षण हे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या या ऑनलाइन शिक्षणामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. अशाप्रकारे राज्यातील ही पहिलीच घटना असल्याची माहिती महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या शाळांमध्ये अनेक प्रकारचे तज्ञ शिक्षक असून डिजिटल शाळांचे प्रयोगसुद्धा अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरू असल्याची माहितीही पालकर यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - राज्य पोलीस प्रशासनामध्ये मोठे बदल, अमिताभ गुप्ता पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी
शालेय शिक्षण विभागाने मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील ऑनलाइन शिक्षणाचा लाभ राज्यातील इतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आज परिपत्रक काढले आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू या चार माध्यमांचे राज्य शिक्षण मंडळ तसेच आयसीएससी, सीबीएसई अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू आहेत. हे वर्ग उत्कृष्ट दर्जाच्या प्रशिक्षित विशेष शिक्षकांमार्फत घेण्यात येत आहेत. यासाठी झूम, गुगल क्लासरूम, व्हाट्सअप इत्यादींचा वापर केला जात आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू असलेले हे वर्ग इयत्ता पहिली ते दहावीसाठी ऑनलाईन पद्धतीने दररोज सुरू असून त्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना होत आहे. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागात राज्यातील अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही या ऑनलाइन शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आदेश जारी केले आहेत.
मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या चार माध्यमांच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व वर्गांकरिता प्रत्येक शालेय दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्येक 45 मिनिटांच्या दोन तासिका तसेच इयत्ता नववी व दहावीकरिता चार तासिकांचे लाईव्ह सेशन आयोजित करण्यात येते. दोन क्रमिक पुस्तकांमध्ये दहा मिनिटांचा खंड दिला जातो. या ऑनलाइन अध्यापनाचे रेकॉर्ड, त्याचे सेशन हे युट्युबमध्ये बीएमसी इन हिंदी, इंग्लिश, या नावाने उपलब्ध आहेत.
हेही वाचा - गायब झालेल्या श्वानाच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले अन् धक्काच बसला...
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील या ऑनलाइन वर्गात प्रवेश घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी बृहन्मुंबई पालिकेच्या या portal.mcgm.gov.in संकेतस्थळावर जाऊन online admission from for MCGM schools या ठिकाणी क्लीक करणे आवश्यक आहे. हे अर्ज केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश मंजूर झाल्यावर त्यांना ऑनलाइन वर्गात उपस्थित राहण्याकरता संबंधित लिंक आणि पासवर्ड दिला जाणार आहे. प्रवेश मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना सदर ऑनलाइन वर्गात नियमित उपस्थित राहणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला असेल त्या वर्गात सूचना पाळणे तसेच मूल्यमापन प्रक्रियेत सहभागी होणे, बंधनकारक राहणार आहे. सदर ऑनलाइन वर्गाची सुविधा ही पूर्णपणे मोफत असून अध्ययन निष्पत्ती संबंधित प्रगतीपत्रक ऑनलाइन वर्गात उपस्थित राहिल्याचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.