मुंबई - शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या रुग्णांना बरे करण्यासाठी पालिका आणि आरोग्य विभाग अथक प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेकडून रुग्णांना 'इंजेक्शन टोकीलुझुमॅब' हे औषध दिले जात आहे. या औषधामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये सुधारणा होऊन ते पूर्णपणे बरे झाल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.
मुंबईत कोरोनाचे १४ हजार ७८१ रुग्ण आहेत, ५५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३ हजार ३१३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील रुग्णांना बरे करण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी पालिका आणि आरोग्य विभाग अथक प्रयत्न करत आहेत. रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचार सुविधांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. कोरोना विषाणूची तीव्र बाधा झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 'इंजेक्शन टोकीलुझुमॅब' हे औषध दिले जात आहे. आतापर्यंत सुमारे ४० रुग्णांना हे औषध देण्यात आले. त्यापैकी ३० रुग्णांमध्ये या औषधाचा चांगला परिणाम दिसून आला आहे. १४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
या औषधामुळे रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून त्यांना व्हेंटिलेटर लावण्याची आवश्यकता भासलेली नाही. जगभरातील विविध वैद्यकीय तज्ञ आणि रुग्णालयांत या औषधाचा उपयोग करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. धारावीमधील ३ पैकी एक ३८ वर्षीय पुरुष रुग्ण पूर्णपणे बरा होऊन नायर रुग्णालयातून घरी गेल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
धारावीतील रुग्णांना 'अर्सेनिक अल्बम 30' आयुर्वेदिक औषधे - कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील रुग्णांना लवकर ठणठणीत करत रुग्णांची संख्या कमी करण्याकरता मुंबई महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. धारावीतील कोरोनाबधितांसह संशयित रुग्णांना 'अर्सेनिक अल्बम 30' या आयुर्वेदिक गोळया देण्यात येणार आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रुग्णांना तसेच संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्यांना 'अर्सेनिक अल्बम 30’ गोळ्या देणे परिणामकारक ठरेल, असे केंद्रीय आयुष मंत्रालयाने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. याच मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत पालिकेने धारावीत या सुचनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरुजू स्वाभिमानी नागरी समितीच्या माध्यमातून या गोळ्यांचे वितरण रुग्णांना केले जाणार आहे. मंगळवारी या संस्थेच्या स्वयंसेवकांनी धारावीमध्ये काम सुरू केले आहे. या औषधांचा कोणताही साईड इफेक्ट नसून केंद्राच्या सल्ल्यानेच या गोळ्या दिल्या जात आहेत. धारावीबरोबरच माहीम, दादरमधील रुग्णांसह के पश्चिम विभागातील अंधेरी, वर्सोवा रुग्णांनाही या गोळ्या देण्यात येणार आहेत. तीन दिवस रुग्णाला या गोळ्या देण्यात येणार असून त्यामुळे रुग्ण बरा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.