मुंबई - पुराशी सामना करण्यासाठी मुंबईतील नद्यांची, पर्जन्य जलवाहिन्यांची, पंपींग स्टेशनची तसेच पुलांची काम हाेती घेण्यात येणार आहेत. तसेच इतर मोठ्या प्रकल्पासाठीही निधीची आवश्यक्ता भासणार आहे. या प्रकल्पांसाठी 7 हजार 884 काेटी रुपये निधीची गरज असून भविष्यात प्रकल्प रखडू नयेत यासाठी विशेष निधी तयार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
दिर्घकालिन धाेरण
मुंबईत ताैक्ते वादळानंतर झालेल्या अतिवृष्टीने मुंबईची दाणादाण उडाली. त्यात माेठी जीवित आणि वित्तहानी झाली. सखल भागात पाणी साचले त्याचा निचरा करण्यासाठी सात तास लागले. रेल्वे तसेच रस्ते वाहतूक ठप्प झाली. हा अनुभव लक्षात घेवून पालिका प्रशासनाने आता माेठे मलनिसारण प्रकल्प, पर्जन्य जलवाहिन्या तसेच तुंबलेल्या पावसाच्या पाण्याची निचरा करणार्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबईतील पुराच्या संकटाला सामना करण्यासाठी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यक्ता आहे. आगामी काळात या प्रकल्पांना निधी दिला नाही तर प्रकल्प पूर्ण हाेणार नाहीत. या प्रकल्पांसह रस्त्याची कामेही वेगाने हाती घेतली जाणार आहेत. या कामांसाठी निधी उभारण्याचे दिर्घकालिन धाेरण ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष प्रकल्प निधी उभारला जाणार आहे.
7884 काेटी रुपयांची आवश्यकता
या कामांसाठी 7884 काेटी रुपयांची आवश्यक्ता असून हा निधी भांडवली अर्थसंकल्पातून आणि पाणी पुरवठा विभागातून उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. विशेष प्रकल्प निधी उभारण्याचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरीसाठी पालिका प्रशासनाने सादर केला आहे. येत्या बुधवारी हाेणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास रखडलेले प्रकल्पही मार्गी लागतील असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.