मुंबई - विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) घेण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार आहे. सध्या पालिकेच्या विकास नियोजन विभागात डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेट (डीसीआर) ची प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. टीडीआर घेण्याची प्रक्रिया ऑनलाइन आणि गतिमान करण्यात येईल, अशी माहिती प्रमुख अभियंता सी. पी. चिटोरे यांनी दिली. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
'टीडीआरची प्रक्रिया ऑनलाइन'
जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईमधील नागरिकांना सुविधा देण्याचे काम महापालिकेकडून केले जाते. नागरिकांना तसेच शहरात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना कर भरणे, प्रमाणपत्र मिळवणे आदी सुविधा महापालिकेने ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबईकरांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन, येथील यंत्रणा अध्ययावत करण्यावर पालिकेने भर दिला आहे. प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवून कोरोनाच्या संकट काळात त्यातून पालिकेला आर्थिक बळकटी देण्यासाठी पालिका पावले उचलत आहे. त्याचाच भाग म्हणून, पालिकेची टीडीआर घेण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन करून बांधकाम क्षेत्रालाही मोठा दिलासा देण्याचा पालिकेचा विचार आहे.
'बांधकाम क्षेत्राला दिलासा'
राज्य सरकारने विकास प्रस्तावावरील रस्त्यांच्या रूंदीनुसार ०.४० ते १.४० पट टीडीआर वापरण्याचे धोरण स्वीकारल्यानंतर इमारतींचे बांधकाम क्षेत्र वाढले आहे. आरक्षण आणि बांधकाम टीडीआरच्या माध्यमातून निर्माण झालेला टीडीआर हे बांधकाम व्यावसायिक विकत घेतात. मात्र, बांधकाम व्यवसायात आलेल्या मंदीमुळे टीडीआर निर्मिती आणि मागणी यांच्यात प्रचंड तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे या टीडीआरचे भाव अर्ध्यावर आले आहेत. त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिक टीडीआरच्या मोबदल्यात हाती घेतलेली कामे करण्यास उत्साह दाखवत नाहीत. त्यामुळे याचा फटका पालिकेच्या कामांना बसू लागला आहे. अशा परिस्थितीत टीडीआर बाबत पालिकेने निर्णय घेतल्यास बांधकाम व्यवसायाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.