मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) १९९६ च्या बॅचचे अधिकारी असलेले जयस्वाल हे सध्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कथित कोविड कंत्राट घोटाळा झाला तेव्हा ते मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त होते. ईडीने २१ आणि २२ जूनला घोटाळ्याशी संबंधित असलेल्या मनपा अधिकारी, कंत्राटदार, मध्यस्थ अशा संबंधितांच्या घर, कार्यालये आणि मालमत्तांसह पालिकेचे कार्यालय अशा १६ हून अधिक ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारीत ईडीच्या हाती महत्वपूर्ण कागदपत्रे आणि दस्तऐवज लागले आहेत.
मालमत्ता जप्त : ईडीने केलेल्या छापेमारीमध्ये १५० कोटींच्या ५० हून अधिक मालमत्तांची कागदपत्रे, १५ कोटींच्या बचत ठेवी, ६८.६५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे अडीच कोटी रुपये किंमतीचे दागिने, मोबाईल फोन, लॅपटाॅप यासह अन्य इलेक्ट्राॅनिक उपकरणे ताब्यात घेतली. या मालमत्तेपैकी सुमारे १०० कोटी रुपयांच्या २४ मालमत्ता या जयस्वाल यांच्या असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. जयस्वाल यांच्या पत्नीकडे मढ, आयलॅंड येथे अर्धा एकरचा भूखंड आणि ३४ कोटी रुपये किंमतीचे फ्लॅटस् यांचा समावेश आहे. तर, ईडीने जयस्वाल यांच्या घरातून १५ कोटींच्या ठेवी आणि १३ लाख रुपयांची रोख रक्कमही ताब्यात घेतली होती. दरम्यान, जयस्वाल यांनी ही मालमत्ता ३४ कोटी रुपयांची असून आपल्याला सासरच्या मंडळींकडून मिळाली असल्याचा दावा केला आहे. याचीही पडताळणी ईडीकडून करण्यात येत आहे.
का झाली चौकशी : ईडीच्या अधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या युवासेनेचे सचिव सुरज चव्हाण यांची सोमवारी 8 तास कसून चौकशी केली होती. यातून समोर आलेल्या माहितीच्या आधारेही ईडी जयस्वाल यांच्याकडे चौकशी करत आहे. तसेच, पालिकेने लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून घेतलेल्या सेवा किंवा सामग्रीसाठी सुमारे ३२ कोटी रुपये दिले होते. यातील सुमारे २२ कोटी रुपयांची लॉन्ड्रिंग करण्यात आल्याची शक्यता आहे. जयस्वाल हे पालिकेतील एक प्रमुख अधिकारी होते. आरोग्य सेवा, कर्मचारी, औषधे आणि उपकरणे यांच्या खरेदी कराराशी संबंधित कागदपत्रांवर त्यांनी स्वाक्षरी केली होती. सुजित पाटकर यांच्याशी संबंधित कंपन्यांना कंत्राट देताना कोणते निकष पाळले गेले, याचीही चौकशी ईडीकडून केली जाणार आहे.
कोव्हिट सेंटरमध्ये घोटाळा : मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर रुग्णालयातील खाटांची संख्या कमी पडत होती. अशावेळी मुंबई महापालिकेकडून कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेने गोरेगाव, दहिसर, कांजूरमार्ग आणि मुलुंड येथे जम्बो कोव्हिड सेंटर सुरू केल्याने कोरोनाच्या काळात नागरिकांना दिलासा मिळाला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोव्हिट सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचे सातत्याने आरोप केले आहेत.
हेही वाचा -