मुंबई - पावसाळ्यात मुंबई दरवर्षी तुंबते, तसेच रस्त्यावर मोठ्या संख्येने खड्डे पडतात. याला पालिका प्रशासनाची बेपर्वाई कारणीभूत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केला. देवरा यांनी काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड, माजी खासदार एकनाथ गायकवाड, तसेच पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्यासोबत धारावी येथील नाल्यांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पालिका प्रशासनावर निशाणा साधला.
देवरा म्हणाले, आम्ही आज नाल्यांची पाहणी केली. त्यानंतर तरी प्रशासन जागृत होईल आणि लवकरच कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे. दोन दिवसांनी आम्ही पुन्हा या नाल्यांची पाहणी करू, असेही देवरा यांनी यावेळी सांगितले.
धारावी नाल्यावरील सुरक्षा भिंत दोन वर्षांपूर्वी पडली आहे. पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करूनही ही भिंत बांधण्यात आली नसल्याने येथे अपघात होण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली. नाल्याची सफाई योग्य प्रकारे करण्यात आली नसल्याची, तसेच येथून जवळ असलेले रस्ता क्रमांक १ ते ३ चे काम अद्याप सुरू करण्यात आले नसल्याचीही तक्रार स्थानिकांनी केली. यावर विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना येथील कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.