मुंबई - काेराेनाच्या महामारीच्या काळात मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कार्याची दखल सर्वत्र घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी आज मुंबईचा दौरा केला. यादरम्यान पालिकेने कोरोना रोखण्यात केलेले काम पाहता त्याची अंमलबजावणी दिल्लीतही केली जाईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
संगणकीय सादरीकरण -
लोकसंख्येच्या घनतेसह इतर अनेक आव्हाने असतानाही पालिकेने केलेल्या कार्याची दखल राज्य, देश व जागतिक पातळीवर वेळोवेळी घेण्यात आली आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी नुकताच मुंबईचा अभ्यास दौरा केला. पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या मार्गदर्शनात या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात आयोजित एका विशेष बैठकीदरम्यान काेराेनाच्या प्रतिबंधात्मक उपाययाेजना याचे संगणकीय सादरीकरण व सविस्तर चर्चा करून दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली.
दिल्लीत मुंबई मॉडेल -
'वाॅर्ड वॉर रूम'च्या माध्यमातून साध्य केलेले विकेंद्रीत व्यवस्थापन, रुग्णालयांच्या स्तरावर यशस्वीपणे राबविले प्राणवायू व्यवस्थापन आणि अल्पावधीत उभारलेल्या जंबो रुग्णालयांची माहिती घेतली. प्रत्यक्ष माहिती घेण्याच्या दृष्टीने या प्रतिनिधींनी गोरेगाव येथील महापालिकेच्या जंबो कोविड रुग्णालयाला आणि अंधेरी परिसरातील सेव्हन हिल्स रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथे करण्यात येत असलेल्या व्यवस्थापनाची माहिती घेतली. यानंतर, पालिकेने केलेले कार्य अनुकरणीय असून दिल्लीत देखील लवकरच 'मुंबई मॉडेल' लवकरच आम्ही राबवू अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली.