मुंबई - ट्रॅफिकच्या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांसह वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर पालिकेने मुंबईतील ५ रस्त्यांवर तसेच बेस्ट-बस स्टॉपच्या बाजूला "नो पार्किंग" करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० ऑगस्टपासून या रस्त्यांवर पार्किंग केल्यास दंड आकाराला जाणार आहे.
बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून येत्या ३० ऑगस्ट पासून महापालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या ५ रस्त्यांचा काही भाग प्रायोगीक तत्वावर 'पार्किंग मुक्त' करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे मार्ग व गोखले मार्ग, पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्ग व न्यू लिंक रोड या सुमारे १४ किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूला "नो पार्किंग" करण्यात आले आहे. बेस्ट बस थांब्यांच्या दोन्ही बाजूला ५० मीटर परिसरात 'नो पार्किंग' अधिक प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.
कुठे असेल नो पार्किंग -
महर्षी कर्वे मार्ग : दक्षिण मुंबईतील चर्चगेट स्टेशन ते ओपेरा हाऊस
गोखले मार्ग: दक्षिण मुंबईतीलच दादर परिसरात असणाऱ्या गोखले मार्गावर पोर्तुगिज चर्च ते एल. जे. जंक्शन
लाल बहादूर शास्त्री मार्ग : पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्गावर कल्पतरु ते निर्मल लाईफस्टाईल
स्वामी विवेकानंद मार्ग: पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्गावर जुहू विमानतळ ते ओशीवरा नदी
न्यू लिंक रोड: पश्चिम उपनगरातील 'न्यू लिंक रोड'वर डी. एन. नगर मेट्रो स्टेशन ते ओशीवरा नदी
पर्यायी व्यवस्था-
ज्या ५ रस्त्यांवर हा नियम असेल त्या लगतच्या परिसरात असणाऱ्या सशुल्क पार्किंग बाबत नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी माहिती फलक लावण्यात आले आहेत.
वाहतूक पोलिसांची मदत-
नो पार्किंग बाबतची कार्यवाही अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे. आवश्यक तेथे सूचना फलक बसवणे, अनधिकृत पार्किंगवर कारवाई करणे, इत्यादी बाबींची अंमलबजावणी ही प्रामुख्याने महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावर करण्यात येणार आहे. या अनुषंगाने संबंधित विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत.