मुंबई- कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मुंबईकर मात्र घराबाहेर पडणे बंद करत नव्हते. त्यामुळे, कठोर निर्णय घेत शहरातील पहिली लाईफलाईन अर्थात लोकल बंद करण्यात आली आहे. तर, आता याच निर्णयाला अधीन राहत शहरातील वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-१ सेवा देखील ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. शहर मेट्रो-१ प्रा. लिमिटेड (एमएमओपीएल) च्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आजपासून (२२ मार्च) ते ३१ मार्च पर्यंत मेट्रो सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. सोमवारी सकाळी मेट्रो-१ ची सेवा पुन्हा सुरू होणार होती. मात्र, सरकारने आज मध्यरात्रीपासून लोकल बंद केल्यानंतर रेल्वे अॅक्टनुसार मेट्रोसाठी देखील हा निर्णय लागू करणे गरजेचे होते. त्यानुसार, मेट्रो १ सेवा ही ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. लोकल बंद झाली तरी काहींना मेट्रोचा आधार होता. पण, आता मेट्रो बंद झाल्याने शहरातील दळणवळण ठप्प होणार आहे.
हेही वाचा- कोरोनाशी लढा : तुम्ही सहकार्य करा..आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर; सफाई कामगाराचे आवाहन