मुंबई - उपनगरात एका मातेने आपल्याच मुलीचा बालविवाह लावून दिला. पतीने वर्षभर छळ केल्यानंतर आईकडे आसरा मिळेल म्हणून आलेल्या या मुलीला तिच्या आईने देहविक्री करण्यास भाग पाडले. या पीडित मुलीच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलीस ठाण्यात तिच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईसह इतर ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
आईनेच मुलीचा बालविवाह करून देहविक्री करण्यास भाग पाडले
आरोपी छाया हिने आपल्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने राहुल बुधावले याच्याशी लावून दिला होता. लग्नानंतर राहुल हा नेहमीच तिचा छळ करत होता. यामुळे ती माहेरी येऊन राहु लागली. वारंवार सांगूनही मुलगी पतिकडे जात नसल्याने आईने मुलीस देहविक्री करण्यासाठी चेंबूर परिसरात राहणाऱ्या आशा खंडागळे या महिलेच्या स्वाधीन केले.
आशा खंडागळे हिचा पती आकाश खंडागळे यानेही मुलीचा गैरफायदा घेत तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. या मुलीचा सख्खा भावाने देखील पीडितेस पतीसोबत लैंगिक संबंध न ठेवल्यास तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिली होती.
जागोजागी छळ आणि अत्याचार होत असल्याने अखेर या मुलीने मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मुलीच्या आईसह पाच इतर जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर मानखुर्द पोलिसांनी बलात्कार, पोक्सो तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.