मुंबई - कृषी कायद्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असल्याने तो सर्वत्र यशस्वी होताना दिसत आहे. या दरम्यान मुंबईची जीवन वाहिनी मानली जाणारी मुंबई लोकल सेवा मात्र, सुरळीत चालताना दिसत आहे. भारत बंदचा रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, रेल्वे स्थानकात आणि रेल्वेत प्रवासी संख्या तुरळक आहे.
अनुचित घटना घडू नये म्हणून सुरक्षा तैनात -
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील रिक्षा आणि एसटी वाहतूक, भाजी मार्केट, महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याने भारत बंद मुंबईत काही प्रमाणात अयशस्वी ठरला आहे. भारत बंदला पाठिंबा देणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि डाव्या विचारांचे पक्ष अजून रस्त्यावर उतरले नाहीत. दुपारी साडेबारा वाजता ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक आणि ज्या ठिकाणी बाजार सुरू आहेत. त्याठिकाणी काही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
12 वाजेपर्यंत कोणताही परिणाम नाही -
मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा असंतोष बाहेर पडताना दिसत आहे. मागील दोन महिन्यांपासून पंजाब, हरयाणासह राज्या-राज्यांमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता 'चलो दिल्ली' म्हणत दिल्लीच्या सीमेवर पाऊल ठेवले आहे. १२ दिवसांपासून सिंघु सीमेवर शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. आज संपूर्ण भारत बंदची घोषणा शेतकरी संघटनांनी दिली आहे. मात्र, मुंबईत 12 वाजेपर्यंत तरी बंदचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही.
बंदमुळे नागरिक घरातून बाहेर पडले नाही -
मुंबईसह उपनगरांमध्ये आज भारत बंदमुळे नागरिकांनी बाहेर जाणे टाळले आहे. जे बाहेर पडले त्यातही बस, रिक्षा, टॉक्सिने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बेस्टने रस्त्यावर कमी प्रमाणात गाड्या उतरवल्या आहेत. मात्र, दुपारनंतर गर्दी वाढली तर रस्त्यावर तत्काळ गाड्या सोडल्या जातील, असे बेस्ट प्रशासनाने सांगितले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती बंद -
बाजार समित्यांच्या आवारात व्यापारी व्यापार करतात, माथाडी कामगार कष्टाचे काम करतात. केंद्र सरकारने केलेल्या कृषी व पणन कायद्यातील बदल व नवीन कायद्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर गदा येणार आहे, तसेच माथाडी कामगारांचा रोजगारही हिरावला जाणार आहे. या कायद्यामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तुर्भे येथील एपीएमसीच्या पाचही बाजारपेठांतील कामकाज मंगळवारी पूर्णत: बंद आहेत.