मुंबई - महाराष्ट्र शासनाने रेल्वेला पत्र लिहून सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यास सांगितले आहे. जे चाकरमानी अत्यावश्यक सेवेचा भाग नाहीत, त्यांना प्रवास करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली.
![mumbai local begin again](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-2-28102020-mumbailocal-7209217_28102020190658_2810f_1603892218_1073.jpg)
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने महिलांना दिलासा देत लोकल ट्रेनच्या प्रवासाची मुभा दिली. तर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी अद्यापही लोकलचे दरवाजे बंदच आहेत. अशावेळी सर्वांना लोकल प्रवासाची मुभा केव्हा मिळणार, असा प्रश्न सातत्याने सर्वसामान्य मुंबईकर विचारत होते. तर व्यावसायिक, कर्मचारी आणि सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी कधी मिळणार हा प्रश्न होता. मात्र, आज (बुधवारी) राज्य सरकारने त्याबाबत निर्णय घेत मुंबईकरांना दिवाळीआधी भेट दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने रेल्वेला पत्र लिहून सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवास करण्यास परवानगी देण्यास सांगितले आहे. जे चाकरमानी अत्यावश्यक सेवेचा भाग नाहीत त्यांना प्रवास करण्याची परवानगी मिळावी, अशी सरकारची भूमिका आहे. “याआधी महिलांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. आता वकिलांनाही देण्यात आली आहे. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्यांना परवानगी का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणे हा खूप मोठा अन्याय आहे, असे ट्वीट करत संबंधित प्रवाशाने सीएमओ कार्यालय आणि विजय वडेट्टीवार यांनादेखील टॅग केले होते.
यावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेऊ. यासंबंधित चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल.
मुंबईकरांना दिलासा
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून मुंबईची लाइफलाइन समजली जणारी लोकलसेवा ठप्प आहे. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच आता महिलांना देखील लोकल प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, सर्वांना लोकल प्रवास करू द्यावा, अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात होती. शिवाय दिवाळीसारखा मोठा सण देखील तोंडावर आलेला असताना लोकल प्रवासाच्या मागणीने जोर धरला. अशातच महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे आज सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.