मुंबई - सत्ताधारी शिवसेना आणि मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम वेगात सुरु होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने कोस्टल रोडचे काम थांबवण्याचे आदेश देत कामाला 'ब्रेक' लावला आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर पुढील सुनावणी २३ एप्रिलला होणार आहे, तोपर्यंत पालिकेला हे काम थांबवावे लागणार आहे.
कोस्टल रोडमुळे ब्रीचकॅन्डी येथील टाटा गार्डन नामशेष होणार होते, तसेच मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार होती. प्रकल्पाला देण्यात आलेली स्थगिती हा पालिकेला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. पश्चिम उपनगरातील रहदारीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी 'शामलदास गांधी उड्डाणपूल' (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते 'राजीव गांधी सागरी सेतू' (वांद्रे वरळी सी लिंक) वरळी आणि कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड उभारला जात आहे.
ब्रीच कँडी येथील टाटा गार्डन येथे या रोडचे काम सुरु आहे. या कामादरम्यान समुद्रात भराव टाकला जाणार आहे, तसेच टाटा गार्डनमधील झाडे तोडली जाणार आहेत, सध्या गार्डनमधून रस्ता काढण्याचे काम सुरु आहे. समुद्रात भराव टाकल्याने मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. समुद्रात उभारण्यात येणाऱ्या दोन पिलरमधे २०० मीटर अंतर ठेवावे, अशी सूचना मच्छिमार संघटनांनी पालिकेला केली होती. मात्र, दोन पिलरमधील अंतर ५० मीटर ठेवल्याने बोटींना ये-जा करताना धोका निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता असल्याचे सांगत मच्छिमार संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
कोस्टल रोडसाठी समुद्रात भराव टाकल्याने समुद्री संपत्तीला धोका निर्माण होईल, या आशयाची याचिका आर्किटेक श्वेता वाघ यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. टाटा गार्डनमधील २०० झाडांचा बळी देत हे गार्डन जमीनदोस्त केले जाणार आहे. टाटा गार्डन ३५ वर्षांपासून असून स्थानिक रहिवासी याचा वापर करतात. टाटा गार्डन जमीनदोस्त झाल्यास पावसाळ्यात भुलाभाई देसाई रोड जलमय होईल, असे सोसायटी फॉर इम्प्रुव्हमेंट ग्रीनरी अँड नेचरच्या माध्यमातून न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आल्याचे डॉ. निलेश बक्षी यांनी सांगितले. कोस्टलरोड विरोधातील ५ याचिकांवर एकत्रित सुनावणी करत २३ एप्रिलपर्यंत काम थांबवण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत.