मुंबई - विशेष न्यायालयाने मल्ल्याला आर्थिक मृत्यूदंड दिल्याचा युक्तीवाद कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या वकिलाने उच्च न्यायालयात केला. आज त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली.
मद्यसम्राट म्हणून ओळख असलेला मल्ल्या सध्या विविध बँकांचे ९ हजार कोटी घेऊन विदेशात फरार झाला आहे. विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार विजय मल्ल्याची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे. विजय मल्ल्याचे वकील अमित देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेद्वारे मल्ल्याने म्हटले आहे की, माझी संपत्ती जप्त करून विशेष न्यायालयाने मला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करून आर्थिक मृत्यूदंड दिला आहे.
माझ्यावर असलेले कर्ज आणि त्याचे व्याज मोठे आहे. मात्र, माझी संपत्ती विकून हे कर्ज मला फेडायचे आहे. त्यासाठी मी पूर्ण तयार असून सुद्धा जाणीवपूर्वक मला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे. तसेच माझी संपत्ती जप्त करण्यात आली, असल्याचा उल्लेखही त्याने याचिकेमध्ये केला आहे. विशेष न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणीसुद्धा या याचिकेत करण्यात आली आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी घेत विजय मल्ल्याला विशेष न्यायालयाच्या आदेशावर हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.