मुंबई : घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर गोवंडी-बैंगनवाडी सिग्नल जवळ पालिकेच्या पादचारी पुलाचा सांगाडा कोसळला. ट्रकचा धक्का लागल्याने मध्यरात्री ही घटना घडली. यावेळी वर्दळ कमी असल्याने जीवितहानी टळली आहे. परंतु, पुलाखाली पार्क करण्यात आलेल्या चार गाड्यांचा चुराडा झाला आहे.
रात्री दोनच्या सुमारास उड्डाण पुलाच्या कामासाठी एक ट्रेलर सिमेंटचा मोठा खांब घेऊन येत होता. या ट्रेलरचा धक्का पुलाखाली निर्माणाधीन असलेल्या पादचारी पुलाच्या सांगाड्याला लागला. यामुळे संबंधित सांगाडा कोसळला. याखाली ट्रेलर आणि बाजूला पार्क केलेल्या दोन रिक्षा तसेच एक टेम्पो चिरडला आहे. तर ट्रक चालक राजकुमार आणि वाहतुकीचे नियोजन करणारा समजुद्दीन यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्तांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रात्रभर वाहतूक पोलीस, देवनार पोलीस आणि अग्निशमन दल क्रेनच्या साहाय्याने हा लोखंडी सांगाडा काढण्याचा प्रयत्न करत होते.