मुंबई - दिवसेंदिवस मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस, पालिका कर्मचारी, पत्रकार आदींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी काहींचा मृत्यूही झाला आहे. आता त्यात मुंबई अग्निशमाक दलाची भर पडली आहे. अग्निशमन दलातील तिसऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वच सरकारी पालिका यंत्रणा कोरोनाचा मुकाबला करत आहेत. त्यामध्ये मुंबई अग्निशमन दलाचाही सहभाग आहे. कोरोनाचे आढळून येणारे रुग्ण आणि रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात अग्निशमन दलाकडून औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जात आहे. या कामात सहभागी असलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनामुळे मुंबई अग्निशमाक दलातील तिसऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू मुंबई अग्निशमन दलाच्या 41 अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 22 कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत असून 4 आयसीयूमध्ये आहेत. तर 14 कर्मचारी अधिकारी होम क्वारंटाईन आहेत. आतापर्यंत 3 कर्मचाऱ्यांना डिस्चार्ज देण्यात आहे. 24 मे रोजी गवालिया टँक येथील 57 वर्षीय जवानाचा तर 28 मे रोजी गोरेगाव येथील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आज विलेपार्ले अग्निशमन केंद्रातील आणखी एका जवानाचा मृत्यू झाला आहे. जवानांसाठी आरोग्य सुविधा -अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्य कार्यालयीन इमारतीत अग्निशमन दलातील अधिकारी, जवान यांच्यासाठी डॉक्टर, नर्स, स्टाफ यांच्यासह ३० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मसीना, नायर, वॉकहार्टमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, मृत जवानांच्या वारसाला नोकरी आणि आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी सांगितले.