मुंबई Mumbai Fire : दादरमधील प्रसिद्ध 'कोहिनूर स्क्वेअर' इमारतीमधील पार्किंगमध्ये सोमवारी मध्यरात्री रात्री 1 वाजेच्या सुमारास आग लागून 16 ते 18 गाड्यांचे मोठं नुकसान झालं आहे. मुंबई अग्निशमन दलाकडून ही आग आता पूर्णतः नियंत्रणात आणली गेली असली, तरी या आगीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी स्थानिकांनी कंत्राटदाराला जबाबदार ठरवलं आहे. दरम्यान, ही आग कशामुळं लागली याचा तपास सध्या सुरू आहे.
तासाभरात आगीवर नियंत्रण : मुंबईतील दादर, शिवाजी पार्क इथल्या शिवसेना भवन समोर असलेल्या कोहिनूर स्क्वेअर या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पार्किंगमध्ये मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या आगीचा भडका इतका मोठा होता की यात 16 ते 18 गाड्या जळून खाक झाल्या आहेत. एका तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं असलं तरी सुद्धा अद्याप फायर कुलिंगचं काम सुरू असल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितलंय.
आगीला कंत्राटदार जबाबदार : कोहिनूर इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर मुंबई महानगरपालिकेचा पार्किंग लॉट आहे. परंतु, या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात नियमांचं उल्लंघन करुन गाड्या पार्क केल्या जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी कंत्राटदाराकडून नियमांचं उल्लंघन करुन अशा पद्धतीनं काम केलं जात असून याच कारणानं आग लागल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. ही आग कशामुळे लागली याचा तपास मुंबई पोलिसांकडून तसंच अग्निशमन दलाच्या जवानांकडून केला जात आहे. सध्या आग पूर्णतः नियंत्रणात आली असून या संपूर्ण इमारतीचं फायर ऑडिट सुद्धा तपासलं जाणार आहे.
हेही वाचा -