मुंबई Mumbai Crime News : विनापरवाना बेकायदेशीररीत्या स्वतः जवळ शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेली शस्त्रे आरोपींनी स्वतःजवळ बाळगण्यामागचा हेतू उघड करण्यासाठी पोलीस चौकशी करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हेमराज सिंह रजपूत यांनी दिलीय.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई : पोलिसांना 13 जानेवारीला बेकायदेशीर शस्त्रांबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीची शहानिशा करून परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त हेमराज रजपूत यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके तयार करुन तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पोलीस पथकानं मिळालेल्या माहितीच्या अनुषंगानं सापळा रचून शस्त्रांसह आलेल्या चेतन संजय माळी या आरोपीला 4 पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतलं. आरोपी चेतन माळीच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कलम 3, 5, 25 शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय.
आरोपींकडून 8 पिस्तूल व 15 जुवंत काडतुसे जप्त : आरोपी चेतन माळी याच्या कडून पोलीस कोठडीदरम्यान तपासाअंतर्गत 3 अग्निशस्त्र व 5 जिवंत काडतुसं कल्याण परिसरातून हस्तगत करण्यात आली. तसंच आरोपी चेतन माळी हा सिनु नरसव्या पडिगेला याच्या सतत संपर्कात असल्यानं सिनुलाही अटक करण्यात आली. पोलीस कोठडीतील तपासाअंतर्गत त्याच्याकडून 1 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आले आहेत. चेतन आणि सिनु हे दोन्ही आरोपी सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस कोठडीत आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून आतापर्यंत एकूण 8 पिस्तूल व 15 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर व त्यांचं पथक करत आहे.
हेही वाचा :