मुंबई Mumbai crime news : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष 9 ला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंगशारदा नजीकच्या परिसरातून एका व्यक्तीला बेकायदेशीर शस्त्रासह ताब्यात घेण्यात आलं. नंतर त्याच्या चौकशीअंती त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती कक्ष 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष 9 ला खात्रीलायक माहिती मिळाली होती की, बेकायदेशीर शस्त्र घेऊन एक संशयित व्यक्ती वांद्रे परिसरात येणार आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे पश्चिम परिसरातील रंग शारदा जवळ असलेल्या ऍपको कन्स्ट्रक्शन साईटच्या गेटनजीक सापळा लावण्यात आला होता. त्यामध्ये अलगद सावज अडकले.
वांद्रे पश्चिम येथील ऍपको कन्स्ट्रक्शन गेट जवळ गुन्हे शाखेच्या कक्ष नऊ ने यशस्वीरित्या सापळा रचून अमित प्रदीप किनके वय 27 याला अटक केली आहे. अमित किनके हा आरोपी नागपूर येथे इसासनी झोपडपट्टीत राहणारा असून तो सोमवारी सायंकाळच्या सुमारास वांद्रे पश्चिम येथे बेकायदेशीर रित्या स्वतःकडे बाळगलेले शस्त्र घेऊन आला होता. मात्र आरोपी अमित किनके हा बेकायदेशीर रित्या घेऊन आलेले शस्त्र नेमके कोणास विकण्यासाठी आला होता याबाबत कक्ष नऊ तर्फे तपास केला जात आहे.
आरोपी अमित प्रदीप किनके याच्याजवळ असलेलं शस्त्र कक्ष नऊने जप्त केलं असून आरोपी अमितकडून त्याच्या अंगझडतीत स्टीलची गावठी पिस्तूल आणि लोखंडी गावठी पिस्तूल यांच्यासह अकरा जिवंत काडतुसे पोलिसांना आढळून आली. आरोपीकडे सापडलेली बेकायदेशीर शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. आरोपीला अटक केली असून न्यायालयात हजर केलं जाणार आहे. याप्रकरणी कक्ष नऊने वांद्रे पोलीस ठाण्यात आरोपी अमित किनके विरोधात शस्त्र कायदा कलम 3 आणि 25 सह मुंबई पोलीस कायदा कलम 37(1)(अ) आणि 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कक्ष 9 करणार असल्याची माहिती पक्ष नउ से प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी दिली आहे.
हेही वाचा..