मुंबई Mumbai Crime News : मुंबई पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या मोबाइलवर सध्या एक पत्र प्रचंड व्हायरल होतंय. शुक्रवारपासून व्हायरल होणाऱ्या या पत्रानं खळबळ निर्माण झालीय. पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस कॉन्स्टेबल यांनी मुंबई पोलिसांच्या मोटर परिवहन विभागातील आठ महिला पोलिसांवर बलात्कार केल्याचा आरोप या पत्रात केलाय. मात्र व्हायरल झालेलं पत्र फेक असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या प्रशासन विभागाचे सह पोलीस आयुक्त एस जयकुमार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिलीय.
काय म्हणाले पोलीस : मुंबई पोलिसांना या पत्राबाबत माहिती मिळताच पत्रात नमूद असलेल्या आठ महिलांपैकी सहा महिलांना बोलावून पत्रात केलेल्या आरोपांची शहानिशा करण्यात आली. मात्र, त्या सहा पोलीस महिलांनी आम्हाला कोणताही अशा प्रकारचा त्रास नसल्याचं सांगितलं. तसंच या पत्रातील सही आमची नसून हे पत्र आम्ही पाठवलं नसल्यानं विनाकारण आमची बदनामी होत असल्याचं देखील या महिलांनी पोलिसांना सांगितलंय. या पत्रातील नमूद असलेल्या उर्वरित दोन महिला या मुंबई बाहेर सुट्टी घेऊन गेल्या असल्यानं त्या पोलिसांच्या चौकशीला हजर राहू शकलेल्या नाहीत.
पत्रातील आठ महिला पोलिसांची नावं आणि नावासमोर केलेल्या सह्या एकाच व्यक्तीनं केल्याचं हस्ताक्षरावरुन समजतंय. त्याचप्रमाणे हे पत्र स्पीड पोस्टानं आल्यानं ज्या पोस्टात हे पत्र पोस्ट करण्यात आलं. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून असं कृत्य करणाऱ्या आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार असून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आलाय. - एस जयकुमार, सहा. पोलीस आयुक्त
तीन पानाचं पत्र : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र कोणीतरी वैयक्तिक वादातून लिहून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध नको ते आरोप केल्याची चर्चा आहे. मुंबई पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये हे 3 पानी पत्र वाऱ्यासारखं वायरल झालंय. हे पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, प्रशासन विभागाचे पोलीस सह आयुक्त, गुन्हे विभागाचे पोलीस सह आयुक्त आणि वाहतूक विभागाचे पोलीस सह आयुक्त, नागपाडा येथील मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपायुक्त या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लिहिलंय. या पत्रात आठ महिला कॉन्स्टेबलची नावं आहेत. ज्यांनी त्यांच्यावर अनेक महिन्यांपासून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. हे बलात्कार विभागातील इन्स्पेक्टरपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांनीच हे केलंय, असं या पत्रात नमूद करण्यात आलंय.
पत्रात आरोप काय : स्पीड पोस्टानं अधिकाऱ्यांना पाठवलेल्या या व्हायरल पत्रात सर्व पीडित आठ महिला नागपाडा येथील मुंबई पोलिसांच्या मोटर ट्रान्सपोर्ट विभागात काम करत असल्याचं लिहिलंय. त्यांनी आरोपींची नावं लिहित पोलीस निरीक्षकापासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांनी त्यांच्यावर बलात्कार केलाय. तीन पोलिसांनी एका महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार केला, असा देखील खळबळजनक आरोप करण्यात आलाय. रोजच्या या बलात्कारामुळं दोन महिला कॉन्स्टेबल गरोदर राहिल्या. त्यावर इन्स्पेक्टर साहेबांनी तिला सात हजार रुपये देऊन गर्भपात करण्याचा सल्ला दिला. काही पोलिसांनी शारीरिक संबंधाचा व्हिडिओही बनवला असून त्या आधारे ते ब्लॅकमेल आणि बलात्कार करतात. हे अधिकारीही दारुच्या नशेत ड्युटीवर येतात आणि त्या महिला कॉन्स्टेबलना अश्लील व्हिडिओ पाठवतात आणि अश्लील चॅटिंग करतात असे गंभीर स्वरूपाचे आरोप या पत्रातून करण्यात आले आहेत. मात्र या पत्रातील सर्व आरोप खोटे असल्याची माहिती पत्रातील नमूद आठ महिलांपैकी सहा महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर समक्ष येऊन सांगितलं आहे.
हेही वाचा :