मुंबई : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं भासवून अदानी पोर्ट ट्रस्टमधील कर्मचारी असलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीची एकाला गंडा घालून २.४ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मरिन ड्राईव्ह पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सुरत येथील इलेक्ट्रिकल इंजिनीअर मयूर वनेलनं ई-चलन मोबाइल सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन तयार केले. ते त्याला राज्य पोलिसांना विकायचे होते. त्यातूनच त्याला दिलीप वळसे पाटील यांचा पीए असल्याचं सांगून गंडा घालण्यात आला. वनेलने जास्मिन या मैत्रिणीशी संपर्क साधून तिला सॉफ्टवेअरबद्दल सांगितले. तिने वनेलची ओळख मीरा रोड येथे राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित तेंडुलकर यांच्याशी करून दिली. तेंडुलकर यांच्या माध्यमातून वनेलचा प्रशांत बाजीराव नवघरे यांच्याशी संपर्क झाला.
एक लाखाची मागणी- पोलिसांच्या माहितीनुसार इलेक्ट्रिकल इंजिनीअर वनेल यांनी नवघरे यांच्याशी संपर्क साधून त्यांची आकाशवाणीच्या कॅन्टीनमध्ये भेट घेतली. पाटील यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे नवघरेने वनेल यांना सांगितले. नवघरे यांनी पीडित वनेलला सांगितले की, त्याच्यामार्फत काम पूर्ण करण्यासाठी मला ६ लाख रुपये द्यावे लागतील. त्यानंतर नवघरेने वनेलची नितेश सावदेकर यांच्याशी ओळख करून दिली. नितेश सावदेकरने आपण सायबर सुरक्षा अधिकारी असल्याची माहिती दिली. नवघरेने वनेल यांना मंत्रालय आणि सावदेकर यांच्याकडे सॉफ्टवेअरच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यास सांगितले. त्यासाठी एक लाख रुपये देण्यास सांगण्यात आले.
मुंबईतील कंपनीचे नाव देण्याचा आग्रह- नवघरेच्या बतावणीनंतर वनेलने जानेवारी २०२२ मध्ये मंत्रालयात अर्ज केला. आरोपी नवघरे याने वनेलला सांगितले की, जर त्याला सॉफ्टवेअरचे कंत्राट मिळवायचे असेल तर त्याला मुंबईतील कंपनीचे नाव द्यावे लागणार आहे. त्यासाठी वनेलला मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर जाऊन कंपनीकडे नोंदणी करावी लागेल. वनेलला महापालिकेमधील 'ट्रायडेंट टेक्नॉलॉजी' या कंपनीचा गोमस्ता परवाना मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार काही दिवसांनंतर, नवघरे याने"महाराष्ट्र राज्यासाठी वाहतूक पोलिस मोबाईल ऍप्लिकेशनसाठी मंजूरी मिळवण्यासाठी वनेलला सावदेकरला 1 लाख देण्यास सांगितले. पैसे द्या अन्यथा अर्ज फेटाळण्यात येईल, असे पीडित वनेलला सांगण्यात आले. वनेलने Google Pay द्वारे नवघरेला 1 लाख पाठवले. नवघरे हा वेगवेगळ्या बहाण्याने वनेलकडून पैसे लुटत होता. मार्च 2022 मध्ये, नवघरे याने वनेलने मंत्रालयात व्हॉट्सअॅपवर दिलेल्या याच अर्जावर मंजूरीचा शिक्का मारलेले पत्र पाठवून अर्ज मंजूर झाल्याची माहिती दिली. मात्र, तो अर्ज आणि सर्वकाही बनावट असल्याचे वनेलच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
हा फसवणुकीचा गुन्हा कालच तक्रारदार वनेल यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे पुढील तपास केला जात आहे-मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल
हेही वाचा-