मुंबई : 28 ऑगस्टला सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी टांझानियातील दार-एस-सलाम येथून अनुप सिंग याचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. इमिग्रेशन तपासणी दरम्यान, विमानतळावरील अधिकाऱ्यांना अनुप सिंगचे 13 जानेवारी 2021चे इमर्जन्सी सर्टिफिकेट सापडले. त्यानंतर, इमिग्रेशन अधिकाऱ्याने चौकशी सुरू केली आणि चौकशीदरम्यान अनुप सिंगचे बिंग उघड झाले. 2004 मध्ये तो दिल्लीचा एजंटच्या मदतीने नौरबी येथे गेला होता. दिल्लीच्या एजंटचे नाव सुनील आहे. नौरबीला अनुप हा जगतार सिंग नावाच्या दुसर्या एजंटला भेटला. ज्याने त्याचा टांझानियाला जाण्याचा रस्ता मोकळा करून दिला. जगतार सिंगने त्याला वर्क परमिट दिले. त्याद्वारे अनुप सिंग टांझानियामध्ये राहत होता.
नवीन पासपोर्ट मिळवला : 2005-06 मध्ये जगतार सिंगने अनुप सिंगला युरोपियन देशात नेण्याचे आणि त्याच्या पासपोर्टवर शेंजेन व्हिसा जोडण्याचे आश्वासन दिले. तथापि, अनुप सिंग याने व्हिसावर शंका उपस्थित केली आणि त्यांनी जगतार सिंग यांच्याशी वाद घातला. त्यामुळे जगतार सिंगने अनुप सिंगच्या पासपोर्टमधून शेंजेन व्हिसाचे स्टिकर काढून टाकले. स्टिकर काढल्याने पासपोर्ट खराब झाला. त्यानंतर अनुप सिंगने टांझानियातील भारतीय दूतावासातून नवीन पासपोर्ट मिळवला.
बनावट टांझानिया पासपोर्ट उपलब्ध : 2008 च्या सुमारास जगतार सिंगने अनुप सिंगला बनावट टांझानिया पासपोर्ट उपलब्ध करून दिला. अनुप सिंगने 2011, 2013, 2016 आणि 2018 मध्ये चार वेळा भारतात येण्यासाठी या बनावट पासपोर्टचा वापर केला. टांझानिया पासपोर्ट बनावट असल्याचे लक्षात येताच त्याने तो फाडला आणि टांझानियातील भारतीय दूतावासाकडून आपत्कालीन प्रमाणपत्र घेतले.
चूक झाल्याचे केले मान्य : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चौकशी केली असता, अनुप सिंगने बनावट टांझानिया पासपोर्ट वापरून चार वेळा दिल्लीला गेल्याचे निष्पन्न झाले. भारतीय इमिग्रेशन अधिकार्यांनी टांझानियामधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला, ज्यांनी अनुप सिंग यांना आपत्कालीन प्रमाणपत्र जारी करण्यात चूक झाल्याचे मान्य केले.
एफआयआर केला दाखल : अनुप सिंगने इमिग्रेशन अधिकाऱ्यांना फसवण्यासाठी बनावट पासपोर्टचा वापर केल्यामुळे त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. अनु सिंग विरोधात सहार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ४१९ (फसवणूक), ४२०, ४६५ (बनावट), ४६८ (फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे) आणि ४७१ (बनावट दस्तऐवज) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -
Mumbai Crime: बोरिवलीत फिरणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला, एमएचबी पोलिसांची कामगिरी
Cruise Drug Case : एका परदेशी नागरिकाला एनसीबीने केली अटक, ड्रग्स पुरवठा केल्याचा आरोप