मुंबई: शिवसेनेचे ( शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे हे अडचणीत सापडले आहेत. त्यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदुकीच्या जोरावर स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी घेतल्याची व्यावसायिकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसातील तक्रारीनुसार राज सुर्वेकडून खोट्या सावकारी प्रकरणात गोवण्याची धमकी, महिलेच्या माध्यमातून खोट्या प्रकरणात अडकवण्याचीही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी राज सुर्वेसह एकूण 10-15 जणांविरुद्ध वनराई पोलीस ठाण्यात अपहरण, प्राणघातक हल्ला आणि शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव पूर्व भागातील व्यापारी राजकुमार सिंह यांच्या तक्रारीनुसार, त्यांना बुधवारी त्यांच्या कार्यालयातून जबरदस्तीने उचलून नेण्यात आले. पाटणा येथील मनोज मिश्रा यांना दिलेल्या व्यवसायासाठी दिलेले कर्ज प्रकरण मिटविण्यासाठी बंदुकीच्या जोरावर दबाव टाकण्यात आला. व्यापारी राजकुमार यांना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहिसर येथील कार्यालयात नेण्यात आले. तिथे आमदाराचा मुलगा राज सुर्वे आणि त्यांच्या माणसांनी त्यांना बंदुकीच्या जोरावर कर्जाचे प्रकरण मिटवण्याची धमकी दिली. याबाबत कोणाशीही बोलू नका, अशी धमकी दिल्याचे राजकुमार यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
करारनामा रद्द झाल्याचे झाल्याचे जबरदस्तीने लिहून घेतले-राजकुमार सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, मनोज मिश्रा याच्याबरोबर 5 वर्षांचा करारनामा करण्यात आला होता. त्याप्रमाणे पैसे परत न करता केलेला करारनामा जबरदस्तीने रद्द करण्याकरिता आरोपींनी शिवागाळ व मारहाण केली आहे. राजकुमार यांना कार्यालयातून खेचून कारमध्ये बसून प्रकाश सुर्वे यांच्या युनिवर्सल हायस्कुल जवळ, दहिसर पूर्व मुंबई या कार्यालयात आणण्यात आले. राजकुमार यांच्याकडून जबरदस्तीने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मनोज मिश्रा यांच्यासोबत झालेला करारनामा रद्द झाल्याचे लिहून घेतले.
9 कोटींचे प्रकरण- अखेर पोलिसांनी व्यापारी राजकुमार यांची अपहरणकर्त्यांपासून सुटका केली. राजकुमार यांचे वडील सदानंद शेट्टी म्हणाले की, हे संपूर्ण प्रकरण साडेआठ कोटी रुपयांचे आहे. हे पैसे राजकुमार सिंह यांनी आदिशक्ती फिल्म्सचे मालक व आरोपी मनोज मिश्रा यांना संगीत निर्मितीसाठी दिले होते. वनराई पोलीसांनी या प्रकरणात मनोज मिश्रा, पद्माकर, राज सुर्वे, विकी शेट्टी व इतर 10 ते 12 अनोळखी लोकांविरोधात अपहरण आणि शस्त्रास्त्र कायद्यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
यापूर्वी आमदार प्रकाश सुर्वे सापडले होते वादाच्या भोवऱ्यात- ठाकरे गटाचे मागाठाणे येथील विभाग प्रमुख विजय राजणेंना आमदार प्रकाश सुर्वे यांनी जीवे मारण्याची सुपारी दिल्याची कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका रॅलीच्या कार्यक्रमात एका जीपमध्ये दिसून आले होते. या व्हिडिओमध्ये 'पप्पी दे पप्पी दे पारुला' हे गाणे ऐकू येत होते. त्यानंतर हा व्हिडिओ मॉर्फ केल्याचा दावा करत म्हात्रे यांनी पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणानंतर शिवसेना ( शिंदे गट) व ठाकरे गट यांच्यातील वाद चिघळला होता.