मुंबई - मुंबईत कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. रुग्णांचा आकडा वाढत असला तरी पुढील आठवड्यापासून रुग्णांचा आकडा कमी होऊन परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे. महानगरपालिकेकडून मुंबईमधील पत्रकारांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यावेळी महापौर पत्रकारांशी बोलत होत्या. पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना चांगल्या सोयी सुविधा द्या, असे निर्देश महापौरांनी पालिका प्रशासनाला दिले.
मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस, अग्निशमन दल अधिकारी, पत्रकार यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पत्रकारांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र देऊन मुंबईमधील पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यास सांगितले होते. मंत्री सुभाष देसाई यांनीही पत्रकारांच्या चाचण्या करावीत असे आदेश पालिकेला दिले होते. त्यासानुसार मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून पत्रकारांच्या कोरोनाबाबत चाचण्या करण्यात आल्या. यावेळी महापौरांनी भेट दिली. या भेटी दरम्यान महापौरांनी स्वताही आपली चाचणी करून घेतली. त्यानंतर महापौर पत्रकारांशी बोलत होत्या.
यावेळी बोलताना पत्रकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. पत्रकार बातम्यांसाठी सर्वत्र फिरत असतात. पत्रकार आणि लोकप्रतिनिधी लोकांसाठी काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या चाचण्या करून ते पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्यावर चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करावेत असे निर्देश महापौरांनी पालिका प्रशासनाला दिले. सध्या कुठलीही लक्षणे नसली तरी रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. ही धोक्याची घंटी असल्याचे महापौरांनी सांगितले. आपण सुदृढ तर सर्व सुदृढ या भावनेने काम करण्याची गरज असल्याचे महापौर म्हणाल्या.
मुंबईत सध्या कोरोना विषाणूचा कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही, एकाच घरातील, एकाच समुदायातील लोकांना लागण होत आहे, मात्र लोक बरे होऊन घरी जात आहेत. आज जी आकडेवारी समोर येत आहे ती आपण लोकांमध्ये जाऊन रुग्णांचा शोध घेत असल्याने समोर येत आहे. मागील आठवड्यातच आकडा वाढलं तरी तो हळू हळू कमी होईल, पुढच्या आठवड्यात निश्चित आकडा कमी होईल आणि आपल्या कंट्रोलमध्ये सर्व असेल असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला. क्वारंटाईन आणि आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांना नाष्टा, जेवण वेळेवर मिळत नाही हे मान्य आहे, मात्र ज्या विभागात अन्नाची गरज आहे त्याठिकाणी आमदार, खासदार, नगरसेवक पालिका, पोलीस अन्न पोहोचवत आहेत. रेडी फूडही सर्वत्र पोहोचवले जात असल्याचे महापौरांनी सांगितले.