मुंबई: मुंबई महापालिकेकडून खड्डेमुक्त मुंबईसाठी नवीन सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. महापालिका Mumbai Municipal Corporation क्षेत्रातील सर्व रस्ते सिमेंट क्राँक्रिटच्या रस्त्यांमध्ये रुपांतरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. डांबरी मास्टिंग रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमध्ये रुपांतर केले जाणार आहे. हे रस्ते मजबूत, गुळगुळीत व टीकाऊ राहतील यावर भर दिला जात आहे. त्यामुळे नव्या रस्त्यांवर एजन्सींना खोदकामासाठी पालिकेने मज्जाव केला आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
सिमेंट काँक्रिटचे रस्ते: मुंबईतील रस्त्यांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही पहिल्या पावसांतच रस्ते खड्डेमय होत असल्याची समस्या कायम राहिली आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांवरून मुंबईकरांना कसरत करून प्रवास करावा लागतो आहे. दरवर्षाची ही समस्या दूर करण्यासाठी टीकाऊ व मजबूत रस्ते बांधून खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. डांबरी मास्टिंग रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमध्ये रुपांतर केले जाणार आहे.
खोदकामाची परवानगी नाकारणार: नव्याने बांधलेल्या काँक्रिटच्या रोडवर ट्रेचिंग परवानगीसाठी काही एजन्सीकडून परवानगीसाठी विनंती केली जात आहे. काही एजन्सी वाहिन्य़ा टाकताना किंवा इतर सेवा देण्यासाठी रस्त्यांवर खोदकाम करतात. त्यामुळे अशा एजन्सीना खोदकामासाठी परवानगी दिल्यास रस्ते नादुरुस्त होतील व चांगले रस्ते, खड्डेमुक्त रस्ते देण्याचा उद्देश सफल होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन अशा एजन्सींना नव्या काँक्रिट रोडवर खोदकाम (ट्रेचिंग ) करण्यास पालिकेने मज्जाव केला आहे. ज्या एजन्सी परवानगीसाठी अर्ज करतील ते स्वीकारून नये अशा सूचनाही सहायक आयुक्तांना दिल्या आहेत. त्यामुळे अशा एजन्सींना नव्या रोडवर खोदकामाची परवानगी नाकारली जाणार असल्याची माहिती वेलरासू यांनी दिली.