मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. ( Corona Third Wave in Mumbai ) जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन गुरुवारी १३७०२ शुक्रवारी ११३१७, शनिवारी १०६६१, रविवारी ७८९५, सोमवारी ५९५६ रुग्णांची नोंद झाली. काल मंगळवारी किंचित वाढ होऊन ६१४९ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज बुधवारी पुन्हा ६ हजारावर रुग्ण आढळून आले असून ६०३२ रुग्णांची नोंद झाली आहे. ( Mumbai Corona Update on 19th January 2022 ) आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने सध्या ३१ हजार ८५६ सक्रिय रुग्ण आहेत.
६०३२ नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटेदरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (१९ जानेवारीला) ६०३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ मृत्यूची नोंद झाली आहे. आज १८,२४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख १७ हजार ९९९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ९ लाख ६६ हजार ९८५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ४८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३१ हजार ८५६ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६६ दिवस इतका आहे. मुंबईमधील ५४ इमारती सील आहेत. १२ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.०३ टक्के इतका आहे.
८२.७ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या ६०३२ रुग्णांपैकी ५०६७ म्हणजेच ८४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ५३८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १०३ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३८,१०९ बेडस असून त्यापैकी ५०५८ बेडवर म्हणजेच १३.३ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८२.७ टक्के बेड रिक्त आहेत.
रुग्णसंख्येत चढउतार -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ हाऊ लागली. ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून ९ जानेवारीला १९४७४, १० जानेवारीला १३६४८, ११ जानेवारीला ११६४७, १२ जानेवारीला १६४२०, १३ जानेवारीला १३७०२, १४ जानेवारीला ११३१७, १५ जानेवारीला १०६६१, १६ जानेवारीला ७८९५, १७ जानेवारीला ५९५६, १८ जानेवारीला ६१४९, १९ जानेवारीला ६०३२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
धारावीत १४ रुग्ण -
मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र, मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. ७ जानेवारीला १५० तर ८ जानेवारीला १४७ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. आज १९ जानेवारीला १४ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत आतापर्यंत ८४८९ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ७८४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून २२६ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉनचे २१ नवे रुग्ण -
मुंबईत ओमायक्रॉनचे २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ( Mumbai Omicron Update ) यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा ६७५ वर गेला आहे. परदेशातून आलेले ३०७ प्रवासी तर ३६८ मुंबईकर नागरिकांचा त्यात समावेश आहेत. आतापर्यंत ३०७ परदेशी प्रवासी तर ३३७ मुंबईकर अशा एकूण ६४४ रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.