मुंबई: मुंबईमधील कोरोनाचा प्रसार (mumbai corona cases) आता आटोक्यात आहे. शहरात रोज शंभरहून कमी रुग्ण आढळून येत आहेत. (Mumbai Corona Update). मात्र त्यानंतरही आयसीयूमध्ये २९ रुग्ण आहेत. ४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर ६ रुग्ण गंभीर आहेत. राज्यात XBB व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईमध्ये मात्र अद्याप या व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे मुंबईकरांनी भीती बाळगू नये मात्र कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
६ रुग्ण गंभीर, २९ आयसीयूमध्ये: २४ ऑक्टोबर पासून २९ ऑक्टोबरचा अपवाद वगळता रोज १०० हुन कमी रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या ५८० सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ४९४ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेले केवळ ८० रुग्ण आहेत. त्यातील ऑक्सिजनवर ४, आयसीयूमध्ये २९ रुग्ण आहेत. तर ६ रुग्ण गंभीर आहेत. काही दिवसांपूर्वी गंभीर रुग्णांची आकडेवारी शून्य झाली होती. मात्र आता त्यात वाढ झाली आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता: कोरोनाच्या नव्या XBB, Omicron – BQ.1 (US variant), BA.2.3.20 या सब व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. ऑक्टोबर 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात कोविड -19 च्या रुग्णसंख्येत वाढ झाली. या व्हेरियंटचा प्रसार जलदगतीने होतो. मात्र धोकादायक नाही. मोठ्या मेळाव्यांमध्ये होणारी गर्दी, सणांमध्ये कोविड-नियमांकडे होणारे दुर्लक्ष, कार्यक्रम, जत्रा, बंदिस्त आणि हवेशीर नसलेल्या जागांवर होणारी गर्दी यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशी घ्या काळजी:
- सणासुदीच्या काळात कोविड नियमांचे पालन करा.
- कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले नसल्यास ते त्वरित करून घ्यावे. रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात आली असेल किंवा धोका असेल तर, बूस्टर व्हायरसपासून प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतात. यासाठी ज्यांनी बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी तो घ्यावा.
- बंद खोल्यांमध्ये व्हायरस पसरण्यास मदत होते. यासाठी घरामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
- लक्षणे असलेल्या रुग्णांशी जवळचा संपर्क टाळावा.
- वारंवार हात धुणे.
- शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल, टिश्यू पेपर वापरावा.
- संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे.
- कोरोना लक्षणे दिसू लागताच चाचणी करून घ्यावी. संक्रमणाची साखळी तोडता यावी म्हणून रिपोर्ट येई पर्यंत स्वत: ला इतरांपासून वेगळे करावे. कोरोनाची लागण झाल्याचे लवकर माहिती झाल्यास वेळेवर उपचार किंवा हॉस्पिटलायझेशन करता येईल.
- ज्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो, इम्युनोकॉम्प्रोमाइज केलेले रुग्ण आणि ज्यांनी नुकतेच कोरोना विषाणूचा संसर्ग असलेल्या देशांना भेट दिली आहे अशा लोकांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
मुंबईत कोरोनाचा प्रसार: मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर गेल्या अडीच वर्षात एकूण ११ लाख ५४ हजार ८२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३३ हजार ७६३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५८० ऍक्टिव्ह रुग्ण असून रुग्ण दुपटीचा कालावधी ९१४८ दिवस आहे. गेल्या अडीच वर्षात १५४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाले आहे. मुंबईत मार्च २०२० मध्ये आलेल्या पहिल्या लाटेत दिवसाला सर्वाधिक २८०० रुग्णांची नोंद झाली. जून २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेत दिवसाला ११ हजार, डिसेंबर २०२१ मध्ये तिसऱ्या आलेल्या तिसऱ्या लाटेत दिवसाला २१ हजार तर जून २०२२ मध्ये आलेल्या चौथ्या लाटेत २३०० अशी सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या नव्या सब व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढत असून येत्या दिवाळी आणि इतर सणांच्या दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वाढेल असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. मात्र दिवाळी नंतर मुंबईमधील रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचे आकडेवरुन समोर आले आहे.