मुंबई - दहा रुपयांचे चॉकलेट आणले म्हणून सहा वर्षीय चिमुकलीला मारहाण करत तिच्या नाजूक भागांवर गरम चमच्याने चटके दिल्याची घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. धक्कादायक म्हणजे ती, चिमुकली आरोपी महिलेची पुतणी आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका 40 वर्षीय महिलेला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने 29 सप्टेंबर रोजी तिच्या सहा वर्षाच्या पुतणीला ५० रुपये देऊन बाजारातून चिकन आणण्यास सांगितले होते. चिकन घेऊन आल्यानंतर राहिलेल्या दहा रुपयांत चिमुकलीने चॉकलेट घेतले. याचा राग मनात धरून आरोपी महिलेने चिमुकलीचे हात-पाय बांधून तिच्या तोंडात टॉवेल कोंबला. त्यानंतर तिला मारहाण केली व गरम चमच्याने तिच्या प्रायव्हेट पार्टवर चटकेसुद्धा दिले.
हा प्रकार समोर आल्यानंतर यासंदर्भात मालवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित चिमुकलीला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यासंदर्भात मालवणी पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार ( खुनाचा प्रयत्न ) गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरच्या आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली आहे.
पीडित चिमुकली तीन महिन्यांची असताना तिच्या आईचा मृत्यू झाला. तिचा बाप व्यसनी असून त्याने तिचा सांभाळ करण्यास नकार दिला. यामुळे आरोपी महिलेने तिला स्वतःकडे ठेवून घेतले होते.
हेही वाचा - विक्रोळीत आजारपणाला कंटाळून तरूणाची आत्महत्या
हेही वाचा - प्रियांका गांधींशी यूपी पोलिसांच्या असभ्य वर्तनाबद्दल नीलम गोऱ्हे यांचे अमित शाहंना पत्र