मुंबई - सोशल मीडियावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल विधानावरून युद्ध पेटले आहे. फडणवीस यांच्या विधानाचा निषेध म्हणून काल (सोमवारी) पिंपरीत शिवसेनेच्या महिला आघाडीने केलेल्या आंदोलनाला आज (मंगळवारी) पुन्हा मिसेस फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली. त्यावर आज शिवसेनेच्या प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी अमृता फडणवीस यांना त्यांच्या करियरवर फोकस करण्याचा सल्ला दिला आहे.
एक सामान्य नागरिक म्हणून महाराष्ट्रात अमृता फडणवीस यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याबद्दल कोणीच काही म्हणत नाही. मात्र, त्या ज्या पद्धतीने शिवसेनेवर टीका करत आहेत ते योग्य नाही. आज देशामध्ये जो आगडोंब उसळला आहे. देशांमध्ये ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. नागरिक केंद्र सरकारचा विरोध करत आहेत. शिवसेनेवर भाष्य करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पक्षाविरोधात जे सुरू आहे. त्यावर भाष्य करावे, असा टोला देखील कायंदे यांनी लगावला. भारतीय जनता पक्षाने अनेक गुन्हेगारांना पक्षात घेतले. भाजपने अनेक लोकांना पक्षात घेऊन त्यांचे कल्याण केले. त्यांच्यावरील गुन्हे क्लिअर केले. त्यावेळी अमृता फडणवीस का बोलल्या नाही? असा प्रश्नदेखील कायंदे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - 'सीएए'साठी सरकारी संपत्तीचे नुकसान करणे अयोग्य - कंगना रानावत