मुंबई Eknath Shinde : मुंबई शहर, उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची महापालिकेमार्फत स्वच्छता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबई शहरातील स्वच्छता, प्रदूषणाबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांबाबतही चर्चा झाली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. या बैठकीला मुख्य सचिव मनोज सौनिक, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव केएच डॉ. गोविंदराज, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे उपस्थित होते.
डिसेंबरपासून विशेष मोहीम : याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील प्रमुख रस्ते, फूटपाथ, चौकाचौकांची नियमित स्वच्छता पालिके मार्फत करावी, अशा सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्यासाठी पालिकेनं अधिक मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. मुंबई स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी दररोज 50 ते 100 कामगार सफाईचं काम करत आहेत. डिसेंबर महिन्यापासून याबाबत मुंबईतील प्रत्येक भागात मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी पालिकेनं प्रयत्न करावेत, अशा सूचना मुख्यमत्र्यांनी दिल्या आहेत.
प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना : यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या चर्चेनुसार, सुमारे 108 स्थानकांमधून दररोज लाखो मुंबईकर उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांचा वापर प्रवासी करतात. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी दूरध्वनीवरून चर्चा करून, स्वच्छतागृहे स्वच्छ राहावीत त्यासाठी महापालिकेला सहकार्य करण्यासाठी करण्याच्या सूचना दिल्या.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर प्रवाशांना दिलासा : रेल्वे स्थानकाची स्वच्छतागृहे मनुष्यबळाअभावी स्वच्छ होत नाहीत. याबाबत प्रवाशांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. यापूर्वीही स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेचा प्रश्न कायम होता. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता, दुर्गंधी, महिला कर्मचाऱ्यांची कमतरता अशा अनेक तक्रारी होत्या. काही स्थानकांतील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सुविधा नाही.
हेही वाचा -