मुंबई - माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांच्या कार्यकाळात, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळात झालेल्या विविध घोटाळ्याची चौकशी राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. यात पर्यटन महामंडळाचे तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी केलेल्या गैरकारभारावर काय चौकशी केली? याचा वस्तुनिष्ठ अहवाल 15 दिवसात पुराव्यांसह सादर करण्याचे आदेश, राज्य पर्यटन विभागाने, पर्यटन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत. यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मागील सरकारच्या काळात झालेल्या "मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल","सारंगखेडा चेतक महोत्सव", तसेच एका उद्योजकांकडून लीज वाढवून देण्यासाठी झालेला व्यवहार आणि महामंडळाच्या खर्चातून छापण्यात आलेले ग्रिटिंग कार्ड, अशा महत्त्वाच्या घोटाळ्यावर विधिमंडळात आरोप झाले होते. या मुद्द्यावर पर्यटन महामंडळ आणि पर्यटन विभाग उत्तर देऊ शकले नाही. याचे कर्तेधरते असलेले तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी नियमबाह्य पद्धतीने मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल आणि चेतक महोत्सवाची निविदा काढली होती.
आशुतोष राठोड यांच्यावर काय आहेत आरोप?
मुंबई शॉपिंग फेस्टव्हलची 1 वर्षासाठी चार कोटींची निविदा असताना, ती पाच वर्षांसाठी 20 कोटी रुपयांची करणे, सारंगखेडा चेतक महोत्सव निविदेतही गडबड करून मनमानी पद्धतीने खासगी कंपनीला पाठीशी घालणे, सरकारला अंधारात ठेवून नियमबाह्य पद्धतीने जवळपास 80 कोटी रुपयांचा कालावधी दहा वर्षासाठी करणे, यात सुरूवातीच्या दोन चेतक फेस्टिव्हलमध्ये केलेला अनागोंदी कारभार, नियमबाह्य पद्धतीने पैसे खासगी कंपनीच्या घशात घालणे, यावर भारतीय महालेखकार तसेच पर्यटन महामंडळाच्या आर्थिक तपासणीत आर्थिक अनियमितता आणि नियमबाह्य काम केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, मुख्य सचिव अजोय मेहता यांनी वित्त विभागाने ओढलेल्या ताशेरेच्या आधारावर सारंगखेडा महोत्सव बंद करण्याचे निर्देश दिले होते. तर पर्यटन महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून अतिरिक्त पदभार असलेले सनदी अधिकारी सुहास दिवसे यांनी मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये झालेल्या अनियमिततेची दखल घेत फेस्टिव्हल रद्द केले होते. त्याच बरोबर याबाबत तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राठोड यांची चौकशी करण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली होती. मात्र तत्कालीन शासनाने सदर शिफारस दाबून ठेवत राठोड यांना अभय देण्याचा प्रयत्न केला.
पण आता तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबत एकूण चौकशी अहवाल पर्यटन महामंडळाला मागितला आहे. त्यामुळे सध्या मुंबई विद्यापीठात कार्यरत असलेले उपकुलसचिव आशुतोष राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली असून या एकूण घोटाळ्याची शासन स्तरावर चौकशी केली जाणार आहे.
हेही वाचा - व्हिडिओ : राज्यात रविवारपासून सलून सुरू.. पाहा दुकानचालकांची तयारी
हेही वाचा - राज्यात स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वितरण सुरळीत, छगन भुजबळांचे स्पष्टीकरण