मुंबई - गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत एसटी महामंडळाला विक्रमी तोटा सहन करावा लागलेला आहे. आता एसटी महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच पुन्हा वीकेंड लॉकडाऊनची झळ महमंडळाला बसू लागली आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी तब्बल 18 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच कोरोना काळात महामंडळाचा संचित तोटाही 9 हजार कोटीपेक्षा अधिक झाला आहे.
3 हजार 800 कोटी रुपयांचे नुकसान
कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षापासून संपूर्ण जगाचे अर्थचक्र मंदावले आहे. या मंदावलेल्या अर्थ चक्राला गती देण्यासाठी उद्योग धडपड करत आहे. एसटी महामंडळही याच परिस्थितीतून जात आहे. गेल्या 72 वर्षे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणखी किफायतशीर प्रवासी दळणवळणाची सेवा देणारी लालपरी आता कोरोना महामारीमुळे आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आली आहे. 4 हजार 549 कोटी रुपयांचा तोटा असणाऱ्या एसटीला कोरोना काळात तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या हक्काच्या 3 हजार 800 कोटीं रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एसटीचा प्रचंड तोटा वाढलेला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात एसटी महामंडळाचा संचित तोटा हा 9 हजार कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे.
दैनंदिन तोट्यात वाढ
गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाची चाक हळूहळू रुळावर येत होते. मात्र, कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने आणि इतर कार्यक्रमांवर निर्बंध आल्याने प्रवाशांची आवक अत्यंत कमी आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला सतत तोटा होत आहे. सध्या शासनाने वाढत्या कोरोना रुग्णामुळे वीकेंड लॉकडाऊन जाहीर करत 30 एप्रिलपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहे. परिणामी एसटीच्या केवळ 20 टक्के वाहतूक सुरू आहे. यातून दररोज सुमारे 6 कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. कोरोनापूर्वी प्रति दिवस एसटी महामंडळाला 22 कोटी रुपयांचे महसूल मिळत होते. त्यावेळी महामंडळाला 3 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत होते. आता कोरोना काळात 6 कोटी रुपये प्रतिदिवस महसूल मिळत असल्याने सरासरी एसटीला प्रत्येक दिवस 18 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त
एसटी महामंडळाला दर वर्षी प्रवासी उत्पन्न व इतर उत्पन्नाचे स्त्रोत धरून फक्त 7 हजार 800 कोटी इतके उत्पन्न मिळते. तर एसटी महमंडळाच्या 1 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनावर वर्षाला 3 हजार 500 कोटी रुपये खर्च होतो. तर साधारणतः इंधनावर 3 हजार कोटी आणि स्पेअर पार्ट आणि टायरला साधारण 600 कोटी इतका खर्च येतो. गेल्या काही वर्षांपासून एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत असल्याने एसटीचा संचित तोटा वाढत आहे.
एसटी महामंडळाचा संचित तोटा हा 2014 -15 आर्थिक वर्षात 1 हजार 685 कोटी रुपये होता. नंतर प्रत्येक वर्षी हा तोटा हळूहळू वाढत गेला आहे. 2018-19 आर्थिक वर्षांत 4 हजार 549 कोटींवर पोहोचला होता. 2020-21 या आर्थिक वर्षांत कोरोनामुळे हा तोटा 9 हजार कोटींच्या घरात जाऊन पोहचला आहेत.
संचित तोट्याची आकडेवारी
आर्थिक वर्ष | संचित तोटा (कोटींमध्ये) |
2014-15 | 1 हजार 685 |
2015-16 | 1 हजार 807 |
2016-17 | 2 हजार 330 |
2017-18 | 3 हजार 663 |
2018-19 | 4 हजार 549 |
2019-20 | 5 हजार 192 |
2020-21 | 9 हजार 500 |
राज्य शासनाने मदत करावी
कोरोनामुळे एसटी महामंडळ गेल्या वर्षापासून आर्थिक अडचणीत सापडली आहे. सध्या महामंडळाकडे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या वेतन देण्यासाठी राज्य शासनाने 1 हजार कोटी रुपयांची महामंडळाला मदत केली होती. मात्र, तो निधी संपलेला असून कोरोनाची परिस्थिती पुन्हा वाढत आहेत. त्यामुळे एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर मर्यादा आली आहे. त्यामुळे शासनाने एसटी महामंडळाला वाचवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी अन्यथा एसटी महामंडळाला शासनात एका विभागाचा दर्जा द्यावा. त्याशिवाय आता दुसरा पर्याय राहिलेला नाहीत अशी प्रतिक्रिया, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा - लसीकरणादरम्यान 'लॉकडाऊन'चे नियम धाब्यावर, पुन्हा लसीकरण ठप्प होण्याची शक्यता
हेही वाचा - पालिका उभारणार 5 हजार बेड, 800 आयसीयूची 4 कोविड सेंटर