मुंबई MSRTC fare hike : ऐन दिवाळीत लालपरी अर्थात एसटीचा प्रवास महागला आहे. दिवाळीच्या निमित्तानं तसंच सुट्ट्या लागल्यानं प्रवाशांमध्ये वाढ होते. त्यातून एसटीची कमाई दरवर्षी वाढते. यावेळी दिवाळीत एसटीनं बोनस कमाई करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. कारण यावर्षी ऐन दिवाळीत एसटीनं भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीनं फक्त दिवाळीच्या काळाताच ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय.
दिवाळी सणासुदीच्या हंगामात एसटीच्या प्रवाशांमध्ये वाढ होते. ही बाब लक्षात घेऊन एमएसआरटीसीनं 8 ते 27 नोव्हेंबर दरम्यान 10 टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं शुक्रवारी एसटीचे ग्राहक वाढणार त्यामुळे वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होत आहे. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की लगेच म्हणजे येत्या 8 ते 27 नोव्हेंबर दरम्यान एसटीनं 10 टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे.
एम एस आर टी सी नं एक प्रसिद्धी पत्रक जारी करून ही दरवाढ जाहीर केली आहे. या भाडेवाढीसंदर्भात राज्य परिवहन महामंडळानं या पत्रकात सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार ज्या प्रवाशांनी घोषणा होण्यापूर्वी तिकीट बुक केलं आहे, त्यांना प्रवासादरम्यान थेट कंडक्टरला फरकाची रक्कमही भरावी लागणार आहे. त्यामुळे अगावू बुकिंग केलेल्यांच्या खिशालाही चाट बसणार आहे.
M S R T C कडे 15,000 बसेसचा ताफा आहे. एसटीतून नियमित अंदाजानुसार दररोज किमान 60 लाख लोक प्रवास करतात. सुट्टीच्या दिवशी यामध्ये वाढच होताना दिसते. त्यामुळे याचा विचार केला तर दिवाळीला एसटीलाच मोठा बोनस मिळणार हे स्पष्ट होत आहे. मात्र ऐन सणासुदीच्या तोंडावर केवळ सु्टटीच्या काळात ही दरवाढ केल्यानं ग्राहकांनी मात्र नाकं मुरडली आहेत. अशावेळी खासगी वाहतूक करणारे आधीच अव्वाच्या सव्वा दरवाढ करतात. त्यात आता एसटीनंही तशीच भूमिका घेतल्यानं लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा
Senior citizen : ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी वाढल्या; एस.टी महामंडळाने घेतली दखल