मुंबई - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) तिजोरीत लवकरच थेट 15 हजार कोटीची भर पडणार आहे. एमएसआरडीसीच्या मालकीच्या जमिनींच्या विक्रीतून ही रक्कम मिळणार असून ही एमएसआरडीसीसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे. या रकमेचा वापर महत्वाकांक्षी अशा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी केला जाणार आहे.
एमएसआरडीसीच्या उत्पन्न स्त्रोतापैकी एक स्रोत म्हणजे जमीन विक्री. 60 ते 90 वर्षांसाठी या जमिनी लीजवर दिल्या जातात. अशा जमीन विक्रीतून आतापर्यंत एमएसआरडीसीने बऱ्यापैकी रक्कम कमावत ती आपल्या विविध प्रकल्पासाठी वापरली आहे. त्यानुसार आता एमएसआरडीसीला वांद्रे, नेपियनसी रोड आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगतच्या जमिनी विकायच्या आहेत. दरम्यान नेपियनसी रोड येथील 1.54 एकर जमिनीच्या विक्रीसाठी ऑगस्ट 2019 मध्ये इच्छुकांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानंतर इतर जमिनीच्या विक्रीसाठी ही प्रस्ताव मागवण्यात येणार होते. ही प्रक्रिया पूर्ण करत मार्च 2020 मध्ये जमीन विक्री करण्यात येणार होती. पण मार्च मध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले.
सर्व मालमत्ता बाजारपेठेतील व्यवहार बंद झाले. याचा मोठा फटका मालमत्ता बाजारपेठेला बसला. जमिनीचे भाव खाली आले. परिणामी एमएसआरडीसीची जमीन विक्री रखडली आहे. पण आता मात्र ही जमीन विक्री लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती राधेश्याम मोपलवार, उपाध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी यांनी दिली आहे. वांद्रे, नेपियनसी रोड आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगतच्या जमिनींची विक्री करण्यात येणार आहे.
यासाठी लवकरच प्रस्ताव मागवण्यात येणार असून तर या जमीन विक्रीतून एमएसआरडीसीला 15 हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. ही रक्कम पूर्णपणे समृद्धी माहामार्ग प्रकल्पासाठी वापरण्यात येणार असल्याचेही मोपलवार यांनी स्पष्ट केले आहे.