मुंबई - ठाकरे सरकारच्या वीज वितरण कंपनीने लॉकडाऊनच्या काळात सरासरी मासिक वीज बिलाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या जनतेची लूट चालवली आहे. अवाजवी वीज बिलांच्या माध्यमातून महावितरणने 20 हजार कोटी रुपयांची लूट केली आहे, असा आरोप भाजपने केला आहे. राज्यभरातून शंभरपेक्षा जास्त बिलांचे वाढीव दर दाखवत, महावितरण कशाप्रकारे घोटाळा करत आहे या 'महावितरणचा काळाचिठ्ठा' पुस्तिकेचे भाजपकडून प्रकाशन करण्यात आले.
'महावितरणचा काळाचिठ्ठा' याचे संकलन किरीट सोमैया यांनी केले आहे. महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा हस्ते मुंबई कार्यालयात त्याचे प्रकाशन करण्यात आले. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र वीज नियामक आयोग (एमइआरसी) येथे किरीट सोमैया व निरंजन डावखरे यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेत अशोक माळगावकर यांच्या 66 हजार 790 रुपयांच्या वीज बिलाचा उल्लेख केला होता. महावितरणने स्वतःची चूक मान्य करत माळगावकरांना शून्य रुपयांचे नविन बिल पाठवले.
महाराष्ट्रभरात सगळ्या ग्राहकांना एप्रिल, मे आणि जून महिन्यात सरासरी वीजबिले पाठवण्यात आली आहेत. जुलै महिन्यातही खरे मिटर रिडिंगकरून बिले पाठवली नाहीत. लाखो ग्राहकांचे जुलै महिन्याचे बिल सरासरी वीजवापराच्या 10 ते 30 पट आहे. महावितरणला 20 हजार कोटी रुपयांची गरज असल्यामुळे महाविकासआघाडी सरकारने अशा पद्धतीने खोटी बिले पाठवून सामान्य ग्राहकांकडून 20 हजार कोटी रुपयांची लूट केली, असे किरीट सोमैया यांनी या पुस्तिकेत म्हटले आहे.
भाजपाकडे वाढीव वीज बिलाच्या आतापर्यंत 40 हजारांहून अधिक तक्रारी आलेल्या आहेत. महावितरणने आपली सगळी बिले ताबडतोब मागे घ्यावीत, पुन्हा नव्याने रीडिंग घेऊन ग्राहकांना बिले पाठवावीत, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. ठाकरे सरकार हफ्ते खाऊ सरकार आहे, असे देखील किरीट सोमैया यांनी म्हटले. या पुस्तिका प्रकाशनाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार निरंजन डावखरे, प्रशांत ठाकूर, राज पुरोहित व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.