मुंबई : राज्यामध्ये एमपीएससी संदर्भातील अभ्यासक्रमात सुधार करण्याबाबत शासनाने समिती नेमली. त्या समितीने दळवी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासक्रम सुधारणा बाबत शिफारसी केल्या आणि तो अभ्यासक्रम राज्यांमध्ये लागू होणार होता. मात्र, विद्यार्थ्यांनी त्या अभ्यासक्रमाला विरोध न करता 2025 नंतर तो लागू करावा अशी मागणी केली. हजार विद्यार्थ्यांची मागणी आज आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडली.
मुख्यमंत्र्यांची घेतली भेट : राज्यामध्ये एमपीएससी बाबत वर्णनात्मक पद्धती पुन्हा अभ्यासक्रमामध्ये लागू करावी, यासंदर्भात रोहित पवार यांनी आज (मंगळवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्या संदर्भात निवेदन मांडले. राज्यातील हजारो एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची एमपीएससीच्या अभ्यासक्रमा संदर्भात महत्त्वाची मागणी होती. त्या मागण्यांना न्याय दिला पाहिजे आणि शासनाने तात्काळ त्याबद्दल निर्णय घ्यावा, या स्वरूपाचे निवेदन रोहित पवार यांनी दिले.
रोहित पवार यांची शासनाकडे मागणी : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने आपल्या या मागणीसाठी पाठपुरावा केलेला होता. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे तसेच डॉ. रणजित पाटील यांच्यामार्फत तसेच सत्ताधारी पक्षातील काही आमदारांच्या द्वारे देखील विद्यार्थ्यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्या मागणीला अद्यापही यश येत नसल्याने विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना भेटून या मागणी संदर्भात विनंती केली होती. विद्यार्थ्यांच्या या भावना मांडण्यासाठीच रोहित पवार यांनी आज या संदर्भातली कळकळीची मागणी शासनाकडे मांडली.
ही तर विद्यार्थ्यांचीच मागणी : ही मागणी राज्यातील हजारो एमपीएससीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. त्यांच्या भावना उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री कडे कळवल्या आहेत. च्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, असे देखील रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले.
तेव्हा भाजप गप्प का? राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जात उद्गार काढले. ना. चंद्रकांत पाटील हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दलही खालच्या पातळीवर जाऊन बोलले. दिल्लीचे भाजपचे प्रवक्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलले, बेंगलोरला छत्रपतींच्या पुतळ्याचा अवमान झाला, तेव्हा भाजपची मंडळी शांत का बसली होती, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक ही दिलेली पदवी अधिक व्यापक असल्याचेही ते म्हणाले.
भाजपच्या लोकांनी मैदानात उतरणे गरजेचे : आमदार रोहीत पवार बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार पवार म्हणाले, स्वराज्यरक्षक हा विचार खूप व्यापक आहे. काही लोक धर्मवीर ही पदवी देतात, काही लोक स्वराज्यरक्षक म्हणतात. तीच अजित पवार यांनी लावली. ज्यावेळी भाजपच्या लोकांनी मैदानात उतरणे गरजेचे होते. त्यावेळी ते शांत बसले. महापुरुषांविरोधात बोलले जात असताना विरोध करण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते. आता अजित पवार यांच्या विरोधात राजकारण करत असतील तर लोकच त्यांना शांत बसण्यास सांगतील.
स्वराज्यरक्षक ही पदवी योग्यच : कोणत्याही पक्षाचा नेता बोलत असताना काही गोष्टी घडतात. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काय वक्तव्य केले हे मी ऐकलेले नाही. पण ते औरंगजेबबाबत काही बोलले असतील तर त्याचा विरोध मी सुद्धा करतो. कोणीही अशा पद्धतीने थोर व्यक्तींबद्दल बोलू नये. काळजीपूर्वकच बोलले पाहिजे. परंतु अजित पवार बोलत असताना त्यांनी स्वराज्यरक्षक ही पदवी दिली असून ती योग्यच आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय युवक कार्यकारीणीत राज्यातील एकाही युवकाचा समावेश नसल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, बाहेरील राज्यात विचार व पक्ष पोहोचावा, यासाठी असा विचार केला गेला असावा. मी स्वतः पक्षाच्या या निर्णय प्रक्रियेत नसतो. त्यामुळे मला याबद्दल फारशी माहिती नाही.