मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या संयुक्त सेवा परीक्षा, 2020 पुढे ढकलल्या आहेत. यासाठी आज परिपत्रक काढून आयोगाने ही माहिती जारी केली आहे.
सध्या टाळेबंदी सुरू आहे. यामुळे 22 मार्च रोजी देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयोगाकडून 26 एप्रिल रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित ही परीक्षा आणि 10 मे रोजी घेण्यात येणारी गट ब, या संयुक्त सेवा परीक्षा 2020 आयोगाने पुढे ढकलल्या आहेत.
पुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. त्यासोबत परीक्षेच्या तारखा निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातूनही माहिती दिली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
17 मे रोजीची परीक्षा होणार का..?
दरम्यान, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आयोगाने जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील एकूण 217 पदांसाठी जाहिरात दिली होती, त्यासाठी आज अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. ही परीक्षा 17 मे रोजी राज्यात घेतली जाणार असून त्यातील बदलांसदर्भात कोणतीही माहिती जारी केली नाही. यामुळे ही परीक्षा होणार काय असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे संकेतस्थळ आज दुपारपासून चालत नसल्याने राज्यभरातील शेकडो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला https://www.mpsc.gov.in/ या संकेस्थळावर अनेकदा प्रयत्न केला असता ते सुरू होत नव्हते, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून देण्यात आली.
हेही वाचा - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता