मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाला. या परीक्षेत कोकणातील रत्नागिरी जिह्यातील सुमित खोत प्रथम आला आहे. तर महिला वर्गातून धुळ्याची अश्विनी हिरे राज्यात प्रथम आली आहे. बीड जिल्ह्यातील विष्णुपंत तिडके हे राज्यातून द्वित्तीय तर मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम आला आहे. अनिल कसुर्डे याने तिसरा क्रमांक पटकावला.
लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक गट ब संवर्गातील ६५० पदांसाठी ५ नोव्हेंबर २०१७ ला मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. यात सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त (पूर्व) परीक्षेकरीता ३ लाख ३० हजार ९०९ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक संयुक्त (मुख्य) परीक्षेकरिता १० हजार ३१ उमेदवार पात्र ठरले होते. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी २ हजार ७६३ उमेदवार पात्र ठरले. या उमेदवारांच्या मुलाखती ३ ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०१८ या दरम्यान घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल आयोगाने शुक्रवारी जाहीर केला. प्रवर्गनिहाय शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसात आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने आयोगाकडे अर्ज करावा, असे आवाहन आयोगाने केले आहे.