मुंबई - राज्याच्या विधानासभा रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. विविध पक्षातील दिग्गज नेते पुढे सरसावले आहेत. भाजपची प्रचार मोहिमही शिगेला पोहचल्याचे दिसत आहे. भाजपचे नेते अमित शाह, नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात मोठ्या जोमात होत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसही प्रचाराच्याबाबतीत सरसावल्याचे पहायला मिळत आहे. राहुल गांधी आणि ज्योतीरादित्य शिंदे यांच्या राज्यात प्रचारसभा होणार आहेत. मात्र, काँग्रेस अजुनही थंड आहे का? काँग्रेसचं सध्या चाललयं काय? प्रचार नियोजन, कलम ३७०, मुलभूत मुद्दे अशा अनेक मुद्द्यावर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने केलेली खास बातचीत.
प्रश्न : निवडणूक प्रचारात भाजप ३७० चा मुद्दा उपस्थित करत असताना, त्या विरोधात आपला पक्ष शेतकरी आत्महत्या, महागाई आदी विषयावर अधिक आक्रमक होताना दिसत नाही. उलट काँग्रेस ३७० मुद्द्याचे खंडन करताना अधिक व्यस्त असल्याचे दिसते, यावर काय सांगाल?
उत्तर : ३७० वर खंडन करायचा आमचा प्रश्न नाही. ही निवडणुक महाराष्ट्राची आहे. त्यामुळे येथे महाराष्ट्रातील प्रश्नावर चर्चा चालत आहे. शेतकऱ्यांचे विषय आहेत. महागाई, बेरोजगारी आदी विषयावर आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत. ३७० कलमचा विषय या निवडणुकीत होऊ शकत नाही. आम्ही या सरकारला राज्यातील प्रश्नांची उत्तरे मागतोय, सरकार देत नाही. आणि त्यावर दुर्लक्ष करण्यासाठी ३७० चा विषय पुढे आणला जात आहे. या पाच वर्षात या सरकारने कोणती कामे केली, हे आम्ही त्यांना विचारतो आणि ते मात्र उत्तर द्यायला तयार नाहीत. कारण ते याचे उत्तर देऊ शकत नाहीत. म्हणूनच ते असे वेगवेगळे विषय काढत आहेत असं आमचे मत आहे.
प्रश्न : काँग्रेसचा या निवडणुकीत म्हणावा तितका आक्रमकपणा अजूनही दिसत नाही यावर नेमके काय सांगाल?
उत्तर : राज्यात खूप मोठ्या सभा होताना दिसत नसल्या तरी राज्यातील जिल्ह्यामध्ये, तालुक्या-तालुक्यांमध्ये सभा चालू आहेत. प्रचार सुरू आहे आणि त्या माध्यमातून आम्ही राज्यातील शेवटच्या जनतेपर्यंत जाऊन पोहोचत आहोत. ही वस्तुस्थिती आहे. आमच्या प्रचारात कुठेही आम्ही कमी दिसत नाहीत. थेट मतदारांपर्यंत पोहोचत आहोत. त्यावरच आम्ही निवडणुकीत भर दिलेला आहे.
प्रश्न : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी राज्यात असताना पंढरपूर आणि अहेरीमध्ये एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, हे कितपत उचित वाटते, आणि यातून काय मार्ग काढणार आहात?
उत्तर : यामध्ये पंढरपूरचा निर्णय झालेला आहे. आपण ती जागा राष्ट्रवादीला दिलेली आहे. त्याठिकाणी चुकून आमच्या उमेदवाराचा अर्ज राहिला असला तरी शेवटी निर्णय आमचा आहे. राष्ट्रवादी हा आमचा मित्र पक्ष असल्याने त्यांना मतदान करावं असा आम्ही ठरवलं आहे. आणि त्यासाठी आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. इतर ठिकाणी ही तसेच होईल.
प्रश्न : मित्रपक्षांना आघाडीमध्ये सन्मान मिळाला नाही, अशी कुजबूज सुरू आहे. त्यांना जागा देण्यात आल्या होत्या त्यापैकी १४ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे राहिलेत. त्यामुळे त्यांच्यात आघाडीकडून फसवणूक केली अशी एक भावना निर्माण झाली आहे त्यावर काय सांगाल?
उत्तर : असं त्यांचं मत झाला असेल, परंतु थोडीशी जागांची अडचण होती. त्याची मागणी होती, तेवढ्या संख्येने आम्ही त्यांना जागा देऊ शकलो नाही हे सत्य आहे. असे फार तर म्हणता येईल. परंतु यात फसवणुकीचे भावना कुठेही नाही. आम्ही ही निवडणूक काही लढत आहोत ती एका विचारासाठी लढत आहोत. देश आता एका वळणावर येऊन ठेपला आहे. आणि या सगळ्याचा विचार करता आम्ही एकत्र येणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मला वाटते, मित्र पक्षांनाही आपल्या मनामध्ये आता नाराजी ठेवू नये. जिथे कुठे काही विषय असेल त्यावर चर्चा करून मार्ग काढणे शक्य आहे.
प्रश्न : निवडणुकीत तुम्ही दोन्ही मोठे पक्ष एकत्र आहात राज्यात तुमचा जोरात प्रचार सुरू आहे, परंतु माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरण यावर विधान केलं त्या विधानावर आपली प्रतिक्रिया काय आहे?
उत्तर : खरंतर आमच्यात कुठेही विलीनीकरण ही चर्चाच नाही. मागील दोन महिने आम्ही दोन्ही पक्ष केवळ जागावाटप आणि निवडणुकीसाठी चर्चा करत आहोत. विलीनीकरण करण्याची आमच्याकडे चर्चा झाली नाही आणि ती कुठे नव्हती. ही कदाचित सुशीलकुमारजी यांच्या मनात काहीतरी विचार आला असेल आणि ते सहजपणे बोलून गेले असावेत, त्यापेक्षा अशी कोणते वेगळे काही नसावे असे मला वाटते.
प्रश्न : मुंबईत दोन आणि लातूरमध्ये एक अशी राहुल गांधी यांच्या सभा रविवारी (१३ आक्टोबर) होत आहेत. त्यांच्या आणखी काही सभा होणार आहेत का?
उत्तर : आमचे नेते राहुल गांधी यांची औसा येथे एक आणि मुंबईमध्ये दोन सभा होत आहेत. त्याच्या राज्यात अधिक सभा व्हाव्यात म्हणून आम्ही त्यांची दुसरी तारीख घेत आहोत. याशिवाय अधिक सभा मिळाव्यात यासाठी स्वतः सोनिया गांधी यांना विनंती केलेली आहे. तसेच प्रियांका गांधी यांच्या अधिक सभा घेण्यासाठी व देशातील काँग्रेसचे इतर प्रमुख नेते मंडळी यांनाही आम्ही प्रचारासाठी बोलावणार आहोत.
प्रश्न : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की, राज्यात विरोधकच शिल्लक नाहीत या मुख्यमंत्र्याच्या विधानावर काय सांगाल?
उत्तर : खरतर मुख्यमंत्र्यांना तसं वाटतं. कारण त्यांचा तो भ्रम आहे. त्यांना कायम आभासी दुनियेत जगण्याची एक सवयच लागलेली आहे. मात्र, या मतदानानंतर राज्यात ज्यावेळी मताची पेटी उघडेल, त्यावेळी त्यांना विरोधकच, विरोधक दिसतील.