मुंबई - खासदार संजय राऊत यांनी आज दिल्ली येथे आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, मी आज आणि उद्या दोन दिवस दिल्लीमध्ये आहे. या दोन दिवसात मी अनेक नेत्यांना भेटणार आहे. या भेटीगाठींमध्ये जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक हे देखील आहेत. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा प्रकरणात ज्या प्रकारचे स्फोट केले आहेत, ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. पुलवामा सारख्या विषयावर माध्यमांमध्ये चर्चा होऊ नये, यासाठी सर्वच माध्यम प्रतिनिधी व माध्यम संस्थांवर दबाव आणला जात आहे. पुलवामामध्ये जवानांची हत्या घडवून आणण्यात आली. हा विषय जनतेसमोर जायला हवा.
सत्यपाल मलिक मोठे नेते- पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सत्यपाल मलिक हे देशाच्या राजकारणातील एक मोठे नेते आहेत. सक्रिय राजकारणातील नाव आहे. देशाच्या पुढील वाटचालीत आणि राजकारणात त्यांची काय मदत होऊ शकते हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यांच्याशी मागच्या अनेक दिवसांपासून माझा संवाद सुरू आहे. आता ते आणि मी आम्ही दोघेही दिल्लीत आहोत त्यामुळे निश्चित भेट होईल, अशी प्रतिक्रिया खासदार राऊत यांनी दिली आहे.
देशातील कुस्तीपटू उपोषणाला बसले दुसरीकडे दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर देशातील कुस्तीपटू उपोषणाला बसले आहेत. भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या कुस्तीपटूंचा आहे. महाराष्ट्र देखील कुस्तीची पंढरी मानले जाते. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, भ्रष्टाचारी आणि अत्याचार करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात केंद्र सरकार नेहमीच मागे पडते. याच ठिकाणी जर अन्य पक्षाचे लोक असते तर एव्हाना मन की बात मधून जनतेला आव्हान करण्यात आले असते. मात्र, सध्या तरी मी त्या जंतरमंतरच्या विषयात न पडता इतर जे आणखी महत्त्वाचे विषय आहेत. त्या विषयांमध्ये लक्ष घालण्यासाठी दिल्लीला आलो आहे. दरम्यान, सत्यापाल मलिक यांनी रिलायन्स कंपनीविरोधात तक्रार करणारे वक्तव्य केले होते. त्या घोटाळ्याप्रकरणी त्यांची सीबीआय चौकशी करणार आहे.