मुंबई : उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच वाद सुरू आहे. उध्दव ठाकरे जे काय बोलले, त्यामुळे यांना आरपार मिर्चा लागल्या असल्याचे वक्तव्य मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी केले. कलंक शब्दावर बंदी आहे का? फडणवीस यांना हल्ली फार मिरच्या झोंबतात. मुख्यमंत्री कार्यालयातून गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोषींसोबत संपर्क साधला जात आहे. गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून डिलिंग सुरू असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
गृहमंत्री म्हणून लक्ष देणे गरजेचे : हसन मुश्रीफ यांच्यासाठी कोठडी तुम्ही तयार ठेवली होती. आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसला आहात. काही लोकांना जामीन देऊन तुरुंगातून बाहेर काढले जात आहे. 302 च्या आरोपींना त्यांची माणसे जाऊन भेटत आहेत. त्यांना निवडणुकीसाठी बाहेर काढले जात आहे का? गृहमंत्री म्हणून तुम्ही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. इथे राजकारण नाही? असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला आहे.
गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी डीलिंग सुरू : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्यामध्ये झाकीर नाईकच्या टेरर फंडिंगचा आरोप आहे. साडेचार कोटी रुपये का मिळाले? कसे आले? याची चौकशी होणार आहे की नाही? राहुल कुल 500 कोटींचा घोटाळा आहे. काय कारवाई केली आहे? मुख्यमंत्री कार्यालयातून भयंकर गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोषींसोबत संपर्क साधला जात आहे. का? निवडणुका आहेत म्हणून? मुंबईपासून नाशिक, कोल्हापूरपर्यंत सर्व तुरुंगात संपर्क साधला जात आहे. गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी डीलिंग सुरू असल्याचा दावाही खासदार संजय राऊत यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री कार्यालयातून फोन : गृह खात्याच्या नाकावर टिच्चून त्यांना बाहेर काढले जात आहे. याचा लवकरच खुलासा मी करेन. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन केले जात आहेत. काय करत आहेत गृहमंत्री? तुम्हाला याचा राग आला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी आधी मुख्यमंत्री कार्यालयात लक्ष ठेवावे. तुम्ही घटनात्मक पदावर बसले आहात. आमचे अजून काय वाकडे करणार आहात? मिस्टर फडणवीस मी सुद्धा लोकप्रानिधी आहे. आम्ही जे काही सांगत आहोत, ते समजून घ्या, असा हल्लाबोलही संजय राऊत यानी यावेळी केला.
हेही वाचा :
Sanjay Raut News: उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही-संजय राऊत