मुंबई : खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मुलायम सिंग यादव यांना पद्म पुरस्कार मिळतोय चांगले आहे. ते एक राष्ट्रीय नेते होते. पण, त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा त्यांच्या पक्षाने अशा प्रकारची कुठलीही मागणी केली नव्हती. मात्र, त्याच वेळी या सरकारला सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडत आहे. फक्त तैल चित्र लावून आम्ही बाळासाहेबांचे विचारांचे वारसदार अशा पिपण्या वाजवून चालत नाहीत. सावरकरांना भारतरत्न देणार होते तो कधी देणार? बाळासाहेबांना एखादा पद्म पुरस्कार द्या अशी मागणी आम्ही कधीही केलेली नाही मात्र जर कारसेवकांवर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला जर पद्म पुरस्कार मिळत असेल तर मग बाळासाहेब ठाकरे यांना का नाही?
करसेवकांना गोळ्या मारण्याचे आदेश : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मुलायम सिंग यादव यांना पद्मविभूषण मिळतोय त्याबाबत आम्हाला कोणताही आक्षेप नाही. मात्र, जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा ज्या करसेवकांवर गोळीबार आणि लाठी चार्जचे आदेश दिले गेले होते. ते आदेश देणारे मुलायम सिंग यादव होते. तेव्हा ते संरक्षण मंत्री होते. तेव्हा मुलायम सिंग यादव असे देखील म्हणाले होते जर मला आणखी कर सेवकांना गोळ्या मारण्याची संधी मिळाली तर मी तीही करेल पण बाबरी मशिदीचे संरक्षण करेल. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेत असेल किंवा RSS मध्ये असेल यांनी मुलायम सिंग यादव यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्याची मागणी केली होती. आता यांच्याच सरकारने त्यांना पद्मविभूषण जाहीर केला आहे.
त्यांनी कल्याण डोंबिवलीचे जागा वाचवावि : दुसरीकडे सी वोटर या संस्थेने आगामी निवडणुकांचा सर्व्हे जाहीर केला आहे. या सर्व्हेवर देखील संजय राऊत त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, त्यांना त्यांच्या बाजूचे सर्व हवे असतात. मात्र विरोधातले सर्वे त्यांना मान्य नसतात. आता राष्ट्रीय स्तरावरचा सर्वे आलाय जो त्यांच्या बाजूने आहे. मात्र, महाराष्ट्रातला सर्वे हा त्यांच्या विरोधात आहे. सर्वेनुसार साधारण 30 ते 34 जागा महाविकास आघाडीला मिळतील. मात्र, आमचे म्हणणे असे आहे. साधारण 40 ते 45 जागा या महाविकास आघाडीला असतील. मुख्यमंत्री म्हणतात चार ते पाच जागा मिळाल्या तरी खूप आहे. पण, मी म्हणतो मुख्यमंत्र्यांनी त्यांची कल्याण डोंबिवलीची एक जागा जरी वाचवली तरी ठीक आहे.
पवार योग्य बोलले आहेत : ठाकरे गटाचा नवीन मित्र पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणार की नाही यावर सध्या महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे. कारण, सध्याची चर्चा झाली ती वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्याची चर्चा झालेली नाही. ही चर्चा फक्त शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे युतीचे आहे. त्यामुळे शरद पवार योग्यच बोलत आहेत.