मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना एकापाठोपाठ एक धक्के देण्याची मालिका सुरूच ठेवली आहे. उद्धव ठाकरेंचे खासदार गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kirtikar Join Shinde group) यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. शुक्रवारी त्यांचा प्रवेश सोहळा झाला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या नाराजीवर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं असून कीर्तीकर यांच्या बोलण्याला आता काहीही महत्त्व नसल्याचे राऊत (Sanjay Raut criticizes) यांनी म्हटले आहे.
कीर्तीकारांच्या बोलण्याला अर्थ नाही : यावेळी बोलताना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले की, आता कीर्तिकर यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. कीर्तिकर हे आमचे जेष्ठ नेते होते. या वयात पक्षाने त्यांना आणखी काय देणं अपेक्षित होते ? मी त्यांचा हा दुर्दैवी निर्णय म्हणणार नाही. पण, कीर्तीकरांसारखे नेते पक्ष सोडून जातात. सर्वकाही प्राप्त करून तेव्हा लोकांच्या मनात एक वेगळी भावना निष्ठा या शब्दाविषयी निर्माण होते. कीर्तीकरांना पक्षाने आमदार केले, खासदार केले. मंत्री पद दिले. त्यांना आणखी काय मिळणं अपेक्षित आहे?
उद्या लोक विसरून जातील : कीर्तीकरविषयी पुढे बोलताना राऊत म्हणाले की, गजानन कीर्तिकर कठीण काळात आमचा पक्ष सोडून गेले. ते गेले उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. आपण गेलात आपल्याला शुभेच्छा. अंधेरीच्या निवडणुकीत दिसले की दिशा कोणाच्या दिशेने आहे. हिम्मत असती तर निवडणूक लढायची होती. मला जेलमध्ये टाकले गेले तरी सुद्धा मी पार्टीसोबत आहे. मी काही पक्ष सोडला नाही. असा टोला संजय राऊत यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांना लगावला (Sanjay Raut criticizes MP Gajanan Kirtikar) आहे.
पदांचा सन्मान राखला जावा : पश्चिम बंगालचे मंत्री आणि टीएमसी नेते अखिल गिरी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यानंतर राजकारण तापले आहे. यावर देखील संजय राऊत यांनी भाष्य केले असून ते म्हणाले की, अशा प्रकारची अभद्र टीका महिलांवर आम्ही कधी केली नाही. अशा पदांवर बसलेल्या व्यक्तींचा राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या पदाचा सन्मान राखला पाहिजे आमची पार्टी त्यांच्या विधानाच समर्थन करू शकत नाही.
हिमाचल प्रदेशमध्ये मोठी चुरस : हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांसाठी आज मतदान होत आहे. हिमाचल प्रदेशातील 55 लाखांहून अधिक मतदार 412 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. यावर बोलताना राऊत म्हणले की, हिमाचल प्रदेश मध्ये चुरशीची निवडणूक होणार आहे. तिथे आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस असे तीन पक्ष मैदानात आहेत. या तिघांमध्ये जोरदार चुरस होणार आहे. त्या ठिकाणी प्रियंका गांधी यांनी मेहनत केलेली आहे. त्या ठिकाणी मोठी टक्कर असणार आहे.