मुंबई: महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर एका बाजूला शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी दौऱ्यावर निघाले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. तिकडे मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री देखील सरकार आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत जनतेशी संवाद साधत आहेत. एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नेते तयारीला लागल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
चुना लावणारे सरकारमध्ये सामील: मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधील त्यांच्या पक्षाच्या संमेलनामध्ये जोरदार तोफ डागली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा भ्रष्टाचारी आहे हे आपल्या भाषणात सांगितले आणि नंतर लगेचच अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना आपल्याला दिसले. देश बुडवणारे म्हणजे भ्रष्टाचारी आर्थिक गुन्हेगार असे मोदींना म्हणायचे असेल असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ज्यांनी देशाच्या बँका बुडविल्या आहेत. सहकारी साखर कारखान्यातून जनतेच्या पैसा लुटलेला आहे. ज्यांनी इतर मार्गाने सरकारला चुना लावलेला आहे. हे सगळे आता सरकारमध्ये सामील झाले आहेत.
ते देश बुडव्यांची पूजा करत आहेत: संजय राऊत पुढे म्हणाले की, परंतु यातील काही देश बुडवे यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले आणि महाराष्ट्रात त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. मग या देश बुडव्यांचे काय करायचे? महाराष्ट्रातील सत्ता ही देश बुडव्यांच्या हाती गेलेली आहे. पण, पंतप्रधान कारवाही करणार नाहीत. त्यांचे राज्यातले नेते या देश बुडव्यांची पूजा करत आहेत. 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा कुणी काढला? असा सवाल देखील खासदार राऊत यांनी केला आहे.
अर्थखात्याच्या चाव्या अजित पवारांकडे? उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, देश बुडव्यांच्या हाती जर खाते जात असेल तर त्याचा जाब पंतप्रधान यांना द्यावा लागेल. हे सर्व आर्थिक गुन्हेगार आहेत. त्यांच्या हाती जर अर्थ खात्याच्या चाव्या तुम्ही देणार असाल तर काय बोलणार?
एनसीपी भ्रष्टाचारी पार्टी : शरद पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी भाजपवर टीका केली. यावर बोलताना राऊत म्हणाले की, मी पवारांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. एनसीपी भ्रष्टाचारी पार्टी आहे पंतप्रधान मोदी म्हणत होते. एनसीपीने 70 हजाराचा सिंचन घोटाळा केला. हसन मुश्रीफ यांनी साखर कारखाना घोटाळा केला. छगन भुजबळ यांनी 500 कोटीचा घोटाळा केला. हे आम्ही म्हणत नाही काही दिवसांपूर्वी भाजप म्हणत होती. त्यांच्या चौकशांचे काय झाले? त्यांच्या चौकशी थांबविल्या असल्या तर देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगावे. आमच्या पक्षात आले म्हणून त्यांच्या चौकशी थांबविल्या हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी जनतेसमोर येऊन सांगावे. सगळे आमच्या पक्षात आल्यामुळे आम्ही त्यांच्या चौकश्या थांबवून त्यांना अभय दिलेले आहे हे मान्य करावे. देश बुडव्यांच्या हाती महाराष्ट्र आहे. हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल यांना तुम्हीच देश बुडवे म्हटले होते, असा टोमणा संजय राऊतांनी लगावला आहे.