मुंबई - कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू असून व्यवहार ठप्प आहेत. या काळात दूध संकलन केंद्र सुरळीत चालण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र, ग्रामीण भागात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वाहनांना पेट्रोल पंपवर इंधन दिले जात नाही. त्यामुळे हे शेतकरी आपले दूध संकलन केंद्रात देऊ शकत नाहीत. ही समस्या लक्षात घेऊन खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती केली आहे.
अद्यापही ग्रामीण भागात बहुतांशी पेट्रोल पंपांवर, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वाहनांना इंधन भरू दिले जात नाही. केवळ सरकारी कर्मचारी आणि डॉक्टरांनाच इंधन मिळेल, असे सांगितले जात आहे. घरापासून 4 ते 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या दूध संकलन केंद्रावर दूध घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना दुचाकींचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुचाकीला पेट्रोल उपलब्ध झाले नाही, तर त्यांच्या जवळील दूध, संकलन केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण आहे.
यामुळे दुधाचा तुटवडा निर्माण होऊन शहरी भागातील दूध वितरणावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन त्वरित याबाबतचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्याची विनंती खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.