पुणे : दोन पेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना कोणतीही सवलत देऊ नये तसेच अशा आमदारांनाही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोध पक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. ते रविवारी बारामतीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
'लोकसंख्या वाढीचा मुद्दा गांभीर्याने घ्यावा' : अजित पवार पुढे म्हणाले की, 'लोकसंख्या वाढीच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. माझे आजोबा मला सांगायचे की, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपली लोकसंख्या 35 कोटी होती. आता ती तब्बल 142 कोटींवर पोहोचली आहे. याला आपण सर्वच जबाबदार आहोत'. दोन दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सर्व राजकीय पक्षांनी हा मुद्दा गांभीर्याने घ्यावा, असे प्रतिपादनही अजित पवार यांनी केले होते. 'आपला देश, राज्य, जिल्हा आणि प्रदेश यांच्या भल्यासाठी प्रत्येकाने एक किंवा दोन मुले झाल्यावर थांबले पाहिजे,' असे अजित पवार म्हणाले होते.
'खासदार आणि आमदारांबाबत निर्णय केंद्राच्या हातात' : यापुढे दोन पेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना कोणतीही सवलत देऊ नये, असे अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार पुढे म्हणाले की, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आम्ही तीन अपत्ये असणाऱ्यास ग्रामपंचायत, जिल्हा परिषदांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका लढवता येणार नाही, असा निर्णय घेतला होता. मात्र खासदार आणि आमदारांबाबत असा निर्णय का घेतला गेला नाही, असे लोक मला आता विचारतात. मी त्यांना सांगतो, असा निर्णय घेणे आमच्या हातात नाही. ते केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्राने असा निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे. अजित पवार म्हणाले की, अशा व्यक्तींना जर कोणतीही सवलत दिली नाही तर या प्रकरणी लोक अधिक जागरूक होतील'.