मुंबई - लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी दोन मुलांच्या संदर्भात 'हम दो, हमारे दो' खासगी विधेयक आहे. सर्व नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्यात, देश प्रगती पथावर जावे यासाठी कायद्याच्या माध्यमातून हे विधेयक येणे गरजेचे असल्याचे, खासदार अनिल देसाई म्हणाले.
राष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण धोरण आणलं आहे. याला जोडून हा कायदा आणला गेला पाहिजे. याला कुटुंब नियंत्रण म्हणता येईल. आपल्या लोकसंख्येचा दर चकीत करणारा आहे. येत्या दोन दशकाच्या आत भारत लोकसंख्येत चीनच्या पुढे जाणार आहे. एकाप्रकारे वाढलेली लोकसंख्या देशाला मागे घेऊन जाणारी आहे, अशी चिंता अनिल देसाई यांनी व्यक्त केली.
सध्या हे विधेयक प्राथमिक स्वरूपात आहे, एकदा ते सभागृहात आल्यानंतर त्यावर चर्चा होऊन त्याला पाठिंबा किंवा विरोध होऊ शकतो असे देसाई यांनी सांगितले. आपल्या लोकसंख्यावाढीवर कडक नजर ठेवण्याची तातडीने गरज आहे. या समस्या लक्षात घेता, लोकांना कुटुंब नियंत्रणासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. कर सवलत, शाळा प्रवेश आणि सामाजिक लाभाच्या योजनांना प्राधान्य द्यावे, असे देसाईंनी सुचवले आहे. लोकांना दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देण्यापासून परावृत्त करण्यासाठी, करातील सवलती काढणे, अधिक कर लादणे आणि इतर दंडात्मक तरतुदी करुन उपाययोजना कराव्यात, असाही सल्ला अनिल देसाई यांनी दिला.
हेही वाचा - दुधातील भेसळ रोखण्यासाठी मोबाईल व्हॅनचा वापर - सुनिल केदार